पट्ट्यांची आशा, शेतीसाठी संघर्ष; कोलपल्ली शेतकऱ्यांचे वन प्रशासनाला निवेदन..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी दि,१४ : तालुक्यातील देवलमारी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कोलपल्ली गावातील शेतकऱ्यांनी रेपनपल्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना निवेदन देत वनहक्काच्या जमिनीवर चालू वर्षी शेती करण्याची परवानगी तसेच पट्टे मंजूर करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
या शेतकऱ्यांनी 2005 पूर्वीपासून संबंधित वनजमिनीवर शेतीची मशागत चालवली असून, गेल्या दोन दशकांपासून ते आपल्या हक्कासाठी प्रयत्नशील आहेत. शेतकऱ्यांनी 2001 साली प्रथम वनहक्क पट्ट्यांसाठी अर्ज केले होते.
त्यानंतर काही शेतकऱ्यांना पट्टे मिळाले, मात्र अनेक अर्ज दस्ताऐवजात त्रुटीमुळे परत आले होते.२०२० मध्ये २६ शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे पुन्हा सादर करून निवेदन दिले होते, परंतु अद्याप त्यांच्यावर निर्णय झालेला नाही. सदर अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रलंबित असून, याचा परिणाम शेतकऱ्यांच्या रोजीरोटीवर झाला आहे.
पावसाळा तोंडावर असताना बी-बियाणे व अवजारे तयार असून, अडथळा न आणता शेती करण्याची मुभा मिळावी, अशी विनंती त्यांनी निवेदनातून केली आहे. वनहक्क समितीचे अध्यक्ष रंगा वेलादी, सचिव शंकर चालूरकर, तसेच दिवाकर गावडे, कोमल सडमेक, पुरुषोत्तम आईलवार, मनोज सोयाम व इतर शेतकरी निवेदन देताना उपस्थित होते.
Comments are closed.