सहा महिन्यांपासून विहिरीतून गरम पाणी? गावकऱ्यांमध्ये कुतूहल, वैज्ञानिक तपासणीची मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : अहेरी तालुक्यापासून अवघ्या ४७ किमी अंतरावरील ताटीगुडम गावात गेल्या सहा महिन्यांपासून एक अनोखा निसर्गप्रसंग घडतो आहे. सत्यांना मलय्या कटकु यांच्या घरातील विहिरीतून सतत गरम पाणी येत असून, त्यावरून गावकऱ्यांमध्ये प्रचंड कुतूहल निर्माण झाले आहे. पाणी इतके गरम आहे की थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळावे लागत आहे. विहिरीतून बुडबुडे फुटताना आणि वाफ निघताना दिसते.
या घटनेचा अनुभव घेण्यासाठी आसपासच्या गावांमधून लोक येऊन विहिरीतून पाणी काढून तपासत आहेत. हे पाणी इतके गरम कसे येते? हा प्रश्न सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही जणांनी प्रत्यक्ष हातात पाणी घेऊन पाहिले असून आंघोळीपुरते पाणी उकळून आले आहे, असे सांगितले जात आहे.
भूगर्भातील उष्णतेचा परिणाम, खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया या कारणांपैकी काही असू शकते, असे तज्ज्ञ प्राथमिक स्तरावर सांगत आहेत. देशभरातील विविध ठिकाणी अशा गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद Geological Survey of India ने केली आहे; मात्र गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना उघडकीस आल्याने संशोधनाची आवश्यकता अधिक अधोरेखित झाली आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या प्रकरणाची अधिकृत चौकशी प्रशासनाने करण्याची मागणी केली जात आहे. भूगर्भशास्त्रज्ञ, जलतज्ज्ञ व पर्यावरणतज्ज्ञांच्या मदतीने पाण्याचे तापमान, रासायनिक घटक आणि सुरक्षिततेबाबत तपासणी व्हावी, असे ग्रामस्थांचे मत आहे. अन्यथा या घटनेभोवती अंधश्रद्धेला खतपाणी मिळण्याची भीती आहे.
नक्षलग्रस्त आदिवासी बहुल क्षेत्रात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेली ही घटना केवळ गावकऱ्यांसाठीच नाही, तर संशोधक व प्रशासनासाठीही गूढ ठरली आहे. ताटीगुडमची ही विहीर आता केवळ कुतूहलाचा विषय न राहता शास्त्रीय दृष्टिकोनातून संशोधनाची संधी बनली आहे.