Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पत्नीच्या खुनाच्या प्रकरणी पतीस जन्मठेप – जिल्हा सत्र न्यायालयाचा कठोर निकाल..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.२७ :पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा निर्दयी खून करणाऱ्या पतीस गडचिरोली न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनायक आर. जोशी यांनी दिलेल्या या कठोर निकालात आरोपीस जन्मठेपेसोबत पाच हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून, दंड न भरल्यास सहा महिन्यांच्या वाढीव कारावासाची तरतूद करण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, धानोरा तालुक्यातील मौजा जपतलाई (कोवानटोला) येथील परसराम धानुजी कुमरे ४८याने आपल्या पत्नी मिराबाई परसराम कुमरे ३७ हिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालण्यास सुरुवात केली होती. दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या वादातून परसराम कुमरेने खलबत्याच्या लोखंडी मुसळाने व चाकूने पत्नीवर तडाखेबंद वार करून तिचा जागीच खून केला. या घटनेची माहिती आरोपीच्या बहिणी आशाबाई रावजी पोटावी यांनी पोलिसांना दिली. त्यांच्या फिर्यादीवरून धानोरा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या प्रकरणाचा तपास येरकड पोलिस मदत केंद्राचे उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांनी हाती घेतला. गुन्हा घडल्यानंतर लगेचच आरोपीला अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान आरोपीविरुद्ध ठोस पुरावे, शस्त्रसामग्री आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर सादर करण्यात आले. त्यानंतर दोषारोपपत्र दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली.

सरकारी पक्षाचा युक्तिवाद सहायक जिल्हा सरकारी अधिवक्ता सचिन कुंभारे यांनी मांडला. फिर्यादी, पंच व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे बयान, तपास अधिकाऱ्यांचे अहवाल आणि वैद्यकीय पुरावे यांचा अभ्यास करून न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचे स्पष्ट मान्य केले. परिणामी २६ऑगस्ट २०२५ रोजी न्यायालयाने आरोपी परसराम धानुजी कुमरे याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक आकाश ठाकरे यांच्या तपासाची भूमिका निर्णायक ठरली. कोर्टातील समन्वय व पैरवीसाठी पोलीस निरीक्षक चंद्रकांत वाबळे, श्रेणी पो. उपनिरीक्षक शंकर चौधरी, भैयाजी जंगटे,  जिजा कुसनाके, मिनाक्षी पोरेड्डीवार, जीवन कुमरे आणि छाया शेट्टीवार यांनी महत्त्वाचे काम पाहिले.

गडचिरोली जिल्ह्यातील या निर्णयामुळे महिला अत्याचार व कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांत न्यायालय कडक भूमिका घेत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. चारित्र्यावर संशय घेऊन बायकोचा खून करणाऱ्या पतीस दिलेली जन्मठेप ही शिक्षा समाजाला धडा शिकवणारी ठरणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.