Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अवैध दारूसह ८.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त: गडचिरोली पोलिसांची कारवाई

दारुबंदी जिल्ह्यात चंद्रपूरच्या टोळीचा डाव फसला; एकाला अटक, तिघांवर गुन्हा...

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आलापल्ली, दि. ७ नोव्हेंबर : दारुबंदी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत अवैध दारू तस्करीच्या विरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा निर्णायक मोहीम राबवली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आलापल्ली येथे सापळा रचून देशी–विदेशी दारूसह चारचाकी वाहन असा तब्बल ₹८ लाख ६९ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चंद्रपूर जिल्ह्यातील एकास अटक करण्यात आली असून इतर तिघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गोपनीय माहितीनुसार आलापल्ली मार्गे मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होत असल्याची खबर स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वाखाली सावरकर चौक, आलापल्ली येथे सापळा रचण्यात आला. काही वेळातच चारचाकी वाहन (महिला० EJ-५२७२) भरधाव वेगाने येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता चालकाने आपले नाव पंकज अशोक शर्मा (रा. चंद्रपूर) असे सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाहनाच्या तपासणीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारूचा साठा मिळून आला. त्यात संत्रा देशी दारूचे ३१ बॉक्स (₹२.४८ लाख), रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ७ पेट्या (₹१.४७ लाख), हेवर्ड बियरच्या १४ पेट्या (₹१.०८ लाख), ऑफिसर चॉईस व्हिस्कीच्या २ पेट्या (₹४२ हजार) आणि ट्यूबर्ग बियरच्या ३ पेट्या (₹२१,६००) असा देशी–विदेशी दारूचा मोठा साठा जप्त करण्यात आला. याशिवाय वापरलेले चारचाकी वाहन (₹३ लाख) आणि रेडमी मोबाईल (₹१० हजार) असा एकूण ₹८,६९,४०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.

प्राथमिक चौकशीत आरोपी पंकज शर्माने कबूल केले की, त्याने आणि सुलतान शेख (रा. चंद्रपूर) यांनी मिळून हा साठा किशोर डांगरे व पप्पी झोरे (रा. आलापल्ली) यांच्या सांगण्यावरून आलापल्ली येथे आणला होता. या प्रकरणी पोस्टे अहेरी येथे कलम ६५(अ), ९८(२), ८३ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये चार आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे. चालकाला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि. देवेंद्र पटले (पोस्टे अहेरी) हे करीत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुलराज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात स.पो.नि. भगतसिंग दुलत व दीपक लोणारे यांचा सहभाग होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.