गडचिरोलीत अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन..
नागरिकांना मिळणार सातबारा, मिळकतपत्रिका आणि रंगीत नकाशा यांसारख्या सेवा एका ठिकाणी..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली– उपअधीक्षक भूमी अभिलेख, गडचिरोली यांच्या कार्यालयात सेतु केंद्राच्या धर्तीवर अत्याधुनिक संगणकीकृत भू-प्रणाम केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्राचे उद्घाटन आज निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
या केंद्रामार्फत नागरिकांना सातबारा उतारा, मिळकतपत्रिका, रंगीत नकाशा तसेच इतर महत्त्वाचे अभिलेख अधिक सोप्या पद्धतीने आणि एका ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. यासाठी संबंधित शासकीय शुल्क भरल्यानंतर संबंधित कागदपत्रे तात्काळ मिळणार असल्याने नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांत जाण्याची आवश्यकता राहणार नाही. यामुळे वेळेची बचत होणार असून, प्रशासनाच्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.
यावेळी बोलताना सूर्यवंशी म्हणाले की, “भू-प्रणाम केंद्रामुळे शासकीय सेवा नागरिकांच्या अधिक जवळ गेल्या आहेत. पारदर्शक आणि जलद सेवा देण्यासाठी हे केंद्र एक प्रभावी पाऊल ठरेल.”
कार्यक्रमाच्या निमित्ताने मौजा चुरमुरा येथील मनोहर नानाजी राऊत आणि रत्नमाला पत्रु लोणारे यांना स्वामित्व योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरूपात सनद वाटप करण्यात आले.
या उद्घाटन सोहळ्याला अधिक्षक भूमी अभिलेख नंदा आंबेकर, उपअधिक्षक योगेश कांबळे, जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव तसेच भूमी अभिलेख विभागाचे अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
Comments are closed.