Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

फुलोरा आलेल्या तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव !

रब्बी हंगाम धोक्यात :

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा शेतशिवारात खरीप हंगामात भातपिकाच्या बांधावर तूर पिकाची लागवड दुय्यम पीक म्हणून मोठ्या प्रमाणात केली जाते.

चामोर्शी  तालुक्यात या वर्षात खरीप हंगामातील शेकडो हेक्टर क्षेत्राच्या भात बांधावर तूर पिकाची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीचे पर्जन्यमान चांगले असल्यामुळे तूर पीक चांगले वाढले असून, फुलोऱ्यात आले आहे. परंतु ढगाळ वातावरणामुळे फुलोरा गळून जात असून अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने तूर पिकाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरणाचा पिकांवर परिणाम होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनात पिकाचे शेंडे खुडल्याने अधिक फुटवे व फांद्या येऊन उत्पादन चांगले येण्याचा अंदाज होता. मात्र, मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदल व ढगाळ वातावरणामुळे सध्या फूल बहारावर असलेल्या तूर पिकावर पाने-फुले गुंडाळणारी अळी, पाने-फुले खाणारी अळी, शेंगा व दाणे पोखरणारी अळी, पिसारी पतंगाची अळी आदी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आधीच धान परिपक्वतेच्या अवस्थेत लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हतबल झाला होता. तूर पिकासोबतच नुकतेच पेरणी झालेल्या हरभरा, लाखोळी, पोपट, उळीद, मुंग, मसूर, जवस, ज्वारी व मिरची तसेच भाजीपाला या रब्बी पिकांवर बदलत्या वातावरणाच्या विपरित परिणामामुळे अधिकच हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.  ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तरी शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनासाठी उपाययोजना कराव्यात.

 

हे ही वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.