जिल्हयात धानाऐवजी मक्याचे पीकाला प्राधान्य !
कमी खर्च व कमी श्रमात उत्पादनाची हमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : खरीप हंगामात धान पिकाकरीता जिल्हा प्रसिध्य आहे. परंतु जिल्हा जास्त जंगलांनी व्यापलेला असल्याने सिंचनाच्या सोयी फार कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात दुबार धानाची पेरणी शेतकरी करीत नाही.
अलीकडे शेतकरी नगदी पिकाकडे वाळलेला असून रब्बी हंगामात खात्रीशीर उत्पन्न देणारे पीक म्हणून मका पिकाकडे पाहिले जाते. जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी मका लागवडीकडे वळताना दिसून येत आहे. मका पिकाकरीता कमी पाण्याची गरज असून भिन्न हवामानाशी लवकर समरूप होण्याची क्षमता मका या पिकामध्ये असल्याने जिल्ह्यातील शेतकरी नगदी पिकाकडे वळताना दिसून येत आहेत. मका हे कमी खर्चात व कमी कष्टात होत असल्याने ही शेती फायद्याची ठरत आहे. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही मका पिकास शेतकऱ्याची पसंती आहे.
जिल्ह्यातील एकट्या कुरखेडा तालुक्यात यंदाच्या रब्बी हंगामात तब्बल ७८३ हेक्टरवर मका पीक बहरणार आहे. अन्नधान्य व्यतिरिक्त मक्याचा विविध कामासाठी उपयोग होत असल्याने मक्याची मागणी वाढत आहे. तसेच कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा येथे मक्याची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. मका हे पीक उष्ण हवामानाला प्रतिसाद देणारे असल्याने शेतकरी रब्बी हंगामात या पिकाची लागवड करीत आहेत. धान, मिरचीसह इतर पिकांपेक्षा कमी श्रमात अधिक उत्पादन मका पिकातून घेता येत असल्याने तसेच स्थानिक स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली असल्याने कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांचा सातत्याने मका पिकाकडे ओढा वाढत चालला आहे.
मका उत्तम दर्जाचा असल्याने मक्याला मोठी मागणी आहे. या परिसरातील व्यापाऱ्यांद्वारे येथील मका थेट मध्यप्रदेशात पाठविला जात असल्याने मक्याला दरही चांगला मिळत आहे. शेतकऱ्यांना मका लागवडीतून बऱ्या प्रमाणात आर्थिक उत्पादन मिळत असल्याने तालुक्यात सातत्याने मका लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस तालुक्यात मका पिकाचे क्षेत्र वाढत आहे.
हे ही वाचा,
स्वामित्व योजने अंतर्गत जिल्ह्यातील 64 गावांमध्ये आज सनद वाटप
Comments are closed.