Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कवंडे चकमकप्रकरणी चौकशी सुरू

नागरिकांच्या निवेदनासाठी 15 दिवसांची मुदत...

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, १३ जून २०२५ : एटापल्ली तालुक्यातील कवंडे जंगल परिसरात २३ मे रोजी झालेल्या नक्षलविरोधी कारवाईत चार नक्षलवाद्यांचा (दोन पुरुष, दोन महिला) मृत्यू झाला होता. या घटनेतील मृत्यूंचे नेमके कारण, परिस्थिती व संभाव्य तथ्य स्पष्ट करण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 196 अन्वये अधिकृत दंडाधिकारी चौकशी सुरु करण्यात आली आहे.

या चौकशीसंदर्भात उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्या न्यायालयात जाहीर चौकशी प्रक्रिया सुरू असून, या घटनेची प्रत्यक्ष माहिती असलेल्या नागरिकांकडून लेखी निवेदन मागविण्यात येत आहे. यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, कोणताही नागरिक, प्रत्यक्षदर्शी, सामाजिक कार्यकर्ते किंवा या संदर्भात उपयुक्त माहिती असलेली व्यक्ती शपथपत्रासह आपले निवेदन सादर करू शकते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निवेदनात घटनेचा प्रत्यक्ष अनुभव, घटना घडण्यापूर्वी किंवा नंतरची परिस्थिती, शासकीय यंत्रणांचा सहभाग, किंवा इतर कोणतीही सत्य माहिती समाविष्ट असावी. ही माहिती चौकशी प्रक्रियेसाठी महत्त्वाची ठरणार आहे, असे उपविभागीय अधिकारी नमन गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

सदर निवेदन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, एटापल्ली येथे १५ दिवसांच्या आत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी पुढे येऊन चौकशी प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.