Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जहाल महिला नक्षलवादी पोलिसांना शरण, १६ व्या वर्षापासून नक्षल चळवळीत होती कार्यरत..

वयाच्या १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली – एका सरपंचासह दोन निरपराध व्यक्तींचा खून, सात चकमकीत प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप असलेली जहाल महिला नक्षलवादी संगीता पुसू पोदाडी उर्फ सोनी उर्फ सरिता उर्फ कविता (४०,रा.तुर्रेमरका ता. भामरागड) हिने २१ ऑगस्टला पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. वयाच्या १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत सामील होऊन तिने शस्त्र उचलले होते. तिच्यावर महाराष्ट्र शासनाचे सहा लाख रुपयांचे बक्षीस होते. २००७ मध्ये छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील नैबरेड दलममध्ये सदस्य म्हणून संगीता पोदाडी ही भरती झाली होती. २००८ मध्ये कोहकामेटा दलम माड डिव्हिजनमध्ये तिची बदली झाली. पुढे तिने महासमुंद दलममध्ये काम केले. २०१४ मध्ये तिला सहायक कमांडर म्हणून बढती मिळाली. कार्यकाळात तिचा छत्तीसगडमधील पाच व ओडिशातील दोन अशा एकूण सात चकमकीत सहभाग होता. छत्तीसगडच्या सोनपूर येथील रस्ता कामावरील ट्रॅक्टर व जेसीबी जाळल्याचा गुन्हाही तिने केला होता. ओडिशात २०१२ मध्ये भरतोंडा जि. बरगड गावातील सरपंचाच्या खुनात तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. २०१५ मध्ये तिने जामशेठ व २०१७ मध्ये सालेपल्ली या गावांतील दोन निरपराध व्यक्तींचा खून केला.

आत्मसमर्पणानंतर पुनर्वसनाकरीता केंद्र व राज्य शासनाकडून संगीता पुसू पोदाडी हिला एकूण साडेचार लाख रुपये बक्षीस जाहीर केले आहे. तब्बल दोन तप नक्षल चळवळीला देणाऱ्या संगीताने शस्त्र खाली ठेऊन पोलिसांपुढे शरणागती पत्कारली. नक्षलविरोधी अभियानचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, राज्य राखीव दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा , पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.