Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

डेंग्यू उद्रेकग्रस्त लगामला सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांची भेट; उपाययोजनांची सखोल पाहणी, गावकऱ्यांना स्वच्छतेचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १९ ऑगस्ट – लगाम परिसरात झालेल्या डेंग्यूच्या उद्रेका नंतर आरोग्य विभाग उच्च सतर्कतेवर असून, परिस्थितीचा थेट आढावा घेण्यासाठी हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग विभागाचे सहसंचालक डॉ. संदीप सांगळे (पुणे) यांनी आज गावाला भेट दिली. त्यांनी आरोग्य यंत्रणेशी संवाद साधत, रुग्णालयातील उपचार प्रक्रियेची तपासणी केली तसेच गावकऱ्यांना डेंग्यू बाबत जनजागृती करून स्वच्छतेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले.

आरोग्य यंत्रणेची सज्जता तपासली…

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. सांगळे यांनी लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन डेंग्यूग्रस्त रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली. रुग्णांना योग्य उपचार मिळत आहेत का, आवश्यक औषधे व सुविधा उपलब्ध आहेत का, याची खात्री त्यांनी करून घेतली.

गावात राबविण्यात येत असलेल्या घरोघरी सर्वेक्षण मोहीम, अळीनाशक औषधांची फवारणी, धुरफवारणी यासारख्या प्रतिबंधात्मक उपक्रमांची त्यांनी पाहणी केली. पाण्याच्या साठ्यांवर विशेष लक्ष देऊन, डासांची पैदास होऊ नये यासाठी घेतलेल्या उपाययोजनांवर त्यांनी समाधान व्यक्त केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भेटीदरम्यान उपस्थित अधिकारी…

या पाहणीवेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे, सहसंचालक डॉ. नयना दुफारे (नागपूर), डॉ. सचिन हेमके (क्षयरोग अधिकारी), डॉ. अमित गंभीर (पाथ फाउंडेशन), राज्य कीटकशास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, साथरोग अधिकारी डॉ. रुपेश पेंदाम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मशाखेत्री तसेच स्थानिक प्रशासनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लगाम पीएचसी अंतर्गत आतापर्यंतची कार्यवाही..

कार्यरत आरोग्य पथके : २३

कीटकनाशक फवारणी पूर्ण गावे : १३

धुरफवारणी पूर्ण गावे : १५

RDK तपासणी : ३२९

रक्त नमुने तपासणी : २००

एकूण डेंग्यू तपासणी : ८४९

तापाचे रुग्ण : ६०८

डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण : १३८

हिवताप रुग्ण : ०

ऍडमिट रुग्ण : ८४

सध्या सक्रिय रुग्ण : ६२

समाजाची सहभागिता गरजेची…

आरोग्य विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असले तरी, ग्रामस्थांचा सहभाग हा डेंग्यू नियंत्रणाचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. गावकऱ्यांनी पाणी साठवणुकीच्या पद्धतीत सुधारणा करावी, घरांच्या आसपास स्वच्छता राखावी, तसेच संशयित लक्षणे दिसताच त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

 “आरोग्य विभाग आपत्कालीन परिस्थितीत पूर्णपणे सज्ज आहे. मात्र डेंग्यूचा प्रसार थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे अत्यावश्यक आहे. घरातील पाणी साठवताना खबरदारी घ्या आणि आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस (Dry Day) पाळा.”

 डॉ. संदीप सांगळे

सहसंचालक

Comments are closed.