पत्रकार गुरुदेव अलोणे यांचे कोरोनाने निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी, दि. २३ एप्रिल: येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी गुरुदेव अलोणे (४०) यांचे आज दुपारी १२.१० वाजता दरम्यान कोरोना संसर्गामुळे दुख:द निधन झाले.
गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी त्यांची अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना ब्रह्मपुरी येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची कोविड-१९ चाचणी करण्यात आली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. तीन-चार दिवसापासून त्यांचा कोरोना या संसर्ग रोगाशी संघर्ष सुरु होता. मात्र अचानक श्वासोच्छवासात अधिकच जास्त त्रास वाढत गेल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. त्यांच्या उपचाराकरिता ‘ओ’ पाझीटीव्ह प्लाझ्माची नितांत गरज भासत होती. त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत प्रशासकीय यंत्रणा सुद्धा कामाला लागली होती. परंतु त्यांना ‘ओ’ पाझीटीव्ह प्लाझ्मा वेळेवर न मिळाल्याने गुरुदेव अलोणे यांचे दुःखद निधन झाले.
गुरुदेव अलोणे अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे, निर्भयतेने हसतच बोलणारे उच्चशिक्षित होते. त्यांनी पंजाबराव देशमुख कन्या विद्यालयात कंत्राटी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवणी केली होती. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई शाखा – ब्रह्मपुरी चे सचिव म्हणून कार्य करीत होते. त्यांच्या अश्या तारुण्याच्या ऊंबरठ्यावरील दुःखद निधनाने ब्रह्मपुरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व दोन मुले असा आप्त परिवार आहे.
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई. शाखा – ब्रह्मपुरी चा एक चांगला होतकरू, तळमळीचा पत्रकार हरपलेला आहे. ब्रह्मपुरी शाखेतील अश्या होतकरू पत्रकाराची उनिव भरून निघणे कठीण आहे.


Comments are closed.