Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरकारची स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी ‘कूस’ उपयुक्त

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

पुणे, 13 एप्रिल : “स्त्रीचे गर्भाशय आणि त्याच्याशी संबंधित विविध प्रकारचे शोषण ही वस्तुस्थिती आहे. शासनाची धोरणे चांगली असली तरी त्यांच्या अंमलबजावणीसाठी अनेक वर्षे लागतात. शासनाचे विविध विभाग आणि समाज यांच्यामधील मोठ्या अंतराचीही यात भर पडते. आयुक्तांपासून मंत्र्यापर्यंत सगळे बदलत असताना सरकारची संस्थात्मक स्मरणशक्ती जागृत ठेवण्यासाठी कूस ही कादंबरी उपयुक्त आहे. या संदर्भात सकारात्मक काम उभे करण्यासाठी पुढाकार घेतल्यास सर्वोतोपरी मदत करू,” असे आश्वासन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.

उचित माध्यम प्रस्तुत सर्जनशील कट्ट्याच्या वतीने ‘कूस’ या कादंबरीवर आयोजित ‘कूस : स्त्रीच्या जगण्याचा व आरोग्याचा कथात्मक शोध’ या परिसंवादात डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे, ज्येष्ठ लेखक-समीक्षक डॉ. रणधीर शिंदे, नामांकित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेवती राणे, वंचित विकास संस्थेच्या संचालिका मीना कुर्लेकर, केशायुर्वेदचे डॉ. हरीश पाटणकर, डॉ. रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर, कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “ही कादंबरी समाजाच्या तळागाळातील समूहाच्या दुःखमय अनुभवांची ज्वलंत कहाणी आहे. लेखकाने त्याच्या अनुभवांचे अत्यंत ताकदीनं केलेले चित्रण हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. यातील प्रमुख पात्र सुरेखा ही निघून जाते, असा कादंबरीचा शेवट आहे. ती सुरेखा कुठेही निघून गेली नाही तर ती स्त्रियांच्या चळवळीतच येईल यात शंका नाही. पण ही सुरेखा समाजात कुठेकुठे आहे, हे शोधण्याचे मोठे आव्हान आहे.”

आसाराम लोमटे म्हणाले, “साखर कारखानदारीच्या क्षेत्रात तळाशी असलेल्या समाजसमूहांच्या वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या आतापर्यंत विविध लेखकांनी लिहिलेल्या आहेत. कूस ही मानवी संवेदनेच्या पातळीवर नेणाऱ्या आश्वासक वर्तमान उभे करणारी कादंबरी आहे. ही कादंबरी केवळ प्रश्न उभे करत नाही तर त्या प्रश्नाच्या सोडवणुकीचा मार्गही दाखवते.” ज्ञानेश्वर जाधवर यांच्या कूस या कादंबरीतूनही एक सकारात्मक वर्तमान हाती लागेल, अशी अपेक्षाही लोमटे यांनी व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, “फड, पिशवी आणि काजळी या त्रिदलाशी संबंधित ही कादंबरी आहे. बहूपीडित्वाचा परखड शोध या कादंबरीत घेतला गेला आहे. परिघावरच्या स्त्रियांच्या जगण्याचे अत्यंत रखरखीत यातनादायी वास्तव यात मांडले आहे. कादंबरीतील तपशीलांची शैली, लेखकाची आंतरिक गोवणूक, जगण्याचे आवाज, जिवंत माहोल या कलाकृतीच्या आशयात भर घालतात. भाषा, रितीरिवाजांचे एक सिंफनी यात असून शोधपत्रकारीतेच्या नजरेतून समाज या समस्येकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो, याचे चित्रण ही कादंबरी करते.”

डॉ. रेवती राणे म्हणाल्या, “विशेष करून चाळीशीच्या आतल्या स्त्रियांच्या गर्भपिशव्या काढण्याची कारणे आता द्यावी लागतील, असा निकाल अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचाच अर्थ गर्भाशयात थोडी कुठे गाठ दिसली की पिशवी काढून टाकली जाते, असे आकडेवारी सांगते. याकडे गांभीर्याने पाहायला हवे. या विषयाकडे पाहण्याचे गांभीर्य कूस ही कादंबरी देते.” डॉ. राणे यांनी गर्भाशयाशी संबंधित विविध आजारांबद्दल विस्ताराने माहिती दिली. एकीकडे गर्भपिशवी प्रत्यारोपणाचे प्रयोग यशस्वी होत आहेत त्यासोबतच आपण गर्भपिशवी वाचवण्यालाही महत्व दिले पाहिजे. आपण ‘बेटी बचाव’ ही घोषणा दिली तशी आता ‘थैली बचाव’ ही घोषणा द्यायची वेळ आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

मीना कुर्लेकर म्हणाल्या, “ही एका स्त्रीची प्रातिनिधिक कहाणी आहे. यात निरक्षरता, अनारोग्य, कुपोषण, लैंगिक शिक्षणाचा अभाव, स्त्री-पुरूष असमानता, व्यसनाधीनता, हुंडा, अज्ञान, अंधश्रद्धा याविषयी लेखकाने अत्यंत धाडसाने आणि निर्भीडपणे लेखकाने लिहिले आहे. आजच्या काळात मासिक पाळी विषयी अनेक प्रकारच्या अंधश्रद्धा खोलवर रुजलेल्या आहेत. पाळीकडे प्रॉब्लेम म्हणून बघण्याची मानसिकता स्त्रीच्या मनावर तिच्या शालेय वयापासूनच बिंबवली जाते. हे बदलण्यासाठी स्त्री प्रश्नावर काम करणे गरजेचं आहे. स्त्रियांना माणूसपणाची जाणीव करून देण्यासाठी वंचित विकास संस्था खारीचा वाटा उचलेल.” कादंबरीचे लेखक ज्ञानेश्वर जाधवर यांनी कादंबरीच्या निर्मितीविषयीचा प्रवास विस्ताराने मांडला. प्रदीप चंपानेरकर यांनी प्रकाशकीय मनोगत व्यक्त केले. उचित माध्यम समूहाचे संचालक जीवराज चोले यांनी सूत्रसंचालन केले.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.