“रक्तासाठी जीव धोक्यात; आरमोरी–कुरखेड्यासाठी ब्लड बँकेची आमदार मसरामांची ठाम मागणी”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यातील आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाल्याचा मुद्दा ऐरणीवर आणत आमदार रामदास मसराम यांनी आरमोरी किंवा कुरखेडा येथे तातडीने स्वतंत्र सुसज्ज ब्लड बँक स्थापन करण्याची मागणी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताच्या उपलब्धतेअभावी रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
अपघात, प्रसूतीतील गुंतागुंत तसेच गंभीर आजारांच्या वेळी रुग्णांना रक्तासाठी चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे हलवावे लागते. या प्रक्रियेत उपचारास होणारा विलंब जीवितहानीचा धोका वाढवतो, अशी गंभीर बाब त्यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांमधील डॉक्टर, परिचारिका व तंत्रज्ञांची रिक्त पदे हा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे आरोग्य सेवा विस्कळीत झाली असून तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी त्यांनी केली. तसेच रुग्णवाहिका सेवा वेळेत उपलब्ध न होणे, चालकांची कमतरता आणि तांत्रिक बिघाड यामुळे नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असल्याची वस्तुस्थितीही त्यांनी मांडली.
आरमोरी किंवा कुरखेडा येथे अत्याधुनिक सुविधांनी युक्त ब्लड बँक उभारल्यास परिसरातील हजारो नागरिकांना तातडीची आणि परिणामकारक आरोग्य सेवा मिळू शकेल, असा विश्वास आमदार मसराम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून संबंधित विभागाला आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. परिसरातील नागरिकांनी या मागणीचे स्वागत करत त्वरित निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.


Comments are closed.