लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीची दुहेरी क्रीडा कामगिरी : राज्यस्तरीय स्पर्धेत व्हॉलीबॉल चॅम्पियनशिप आणि उंच उडीत रौप्यपदक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लॉईड्स इन्फिनिट फाऊंडेशनचा अविभाज्य घटक असलेल्या लॉईड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए) च्या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासिक यश मिळवत गडचिरोलीचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने गाजवले आहे. गोंदिया येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एलएसए संघाने चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली, तर पुण्यातील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुश्री मोनिका मडावीने २० वर्षांखालील उंच उडी स्पर्धेत रौप्यपदक मिळवून नवा विक्रम रचला.
२ ते ५ सप्टेंबर दरम्यान पुण्यात झालेल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील तब्बल २१०० खेळाडू सहभागी झाले होते. त्यात गडचिरोलीच्या मोनिका मडावीने १.४० मीटरची झेप घेत उपविजेतेपद पटकावले. या यशाच्या जोरावर मोनिका आता १८ ते २० सप्टेंबरदरम्यान मध्यप्रदेशात होणाऱ्या पश्चिम विभागीय अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी पात्र ठरली असून, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान आणि गोवा या राज्यांतील अव्वल खेळाडूंमध्ये ती गडचिरोलीचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दरम्यान, रामनगर (गोंदिया) येथे झालेल्या राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत एलएसएच्या संघाने दमदार खेळ करून अंतिम सामन्यात २-० अशा फरकाने विजेतेपद मिळवले. एकूण १६ संघ सहभागी असलेल्या या स्पर्धेत एलएसए संघाने शिस्तबद्ध खेळ, संघभावना आणि उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या बळावर राज्यविजेतेपद पटकावून गडचिरोलीच्या क्रीडा क्षमतेला अधोरेखित केले.
या दुहेरी कामगिरीबद्दल लॉईड्स स्पोर्ट्स अकादमीच्या प्रवक्त्याने प्रतिक्रिया देताना सांगितले, गडचिरोलीसारख्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला व्यासपीठ देणे हे आमचे ध्येय आहे. व्हॉलीबॉल आणि अॅथलेटिक्समधील हा यशस्वी टप्पा आमच्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. एलएसएचे प्रशिक्षण हे फक्त राज्यपुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गडचिरोलीच्या तरुणांना झळकवेल, हा आमचा विश्वास आहे.