राज्य-जिल्हा स्पर्धांत पदकांची लयलूट; जिल्ह्याच्या क्रीडाभूमीवर लॉयड्सची छाप
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासी पट्ट्यातील क्रीडा प्रतिभेला संधी मिळाली तर ती राज्यस्तरावरही झळकू शकते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. कोनसरी येथील Lloyds Sports Academy आणि Lloyds Raj Vidya Niketan (एलआरव्हीएन) शाळेच्या खेळाडूंनी राज्य व जिल्हास्तरीय स्पर्धांत पदकांची कमाई करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. अॅथलेटिक्स आणि तिरंदाजी या दोन्ही प्रकारांत लॉयड्सच्या खेळाडूंनी सातत्यपूर्ण आणि प्रभावी कामगिरी नोंदवली.

चंद्रपूर जिल्ह्यातील Brahmapuri Krida Utsav 2026 अंतर्गत आयोजित राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत अंडर-18 मुलींच्या गटात मोनिका मडावी हिने लांब उडीमध्ये सुवर्णपदक आणि 100 मीटर धावण्यात रौप्यपदक पटकावत दुहेरी यश संपादन केले. तिच्या वेग आणि समतोल उडी कौशल्यामुळे ती स्पर्धेचा केंद्रबिंदू ठरली. अंडर-14 गटात एलआरव्हीएनची भाग्यश्री मुलमा हिने गोळाफेकमध्ये सुवर्णपदक आणि 100 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकत आपली बहुआयामी क्षमता सिद्ध केली.
गडचिरोलीतील Pilot Project Archery Center येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तिरंदाजी स्पर्धेतही लॉयड्सच्या खेळाडूंनी अचूक नेमबाजीचा प्रत्यय दिला. अंडर-15 मुलींच्या गटात पल्लवी सुरेश गोडसेलवार हिने सुवर्ण, तर पूर्वी विकास देबनाथ हिने रौप्यपदक जिंकले. अंडर-15 मुलांच्या गटात सागर सुब्रत सरकार याने सुवर्णपदक मिळवले. अंडर-13 गटात उज्ज्वल दिनेश दास याने कांस्य, तर अंडर-10 गटात अनिश बुधन सिंकू याने रौप्यपदक पटकावले. विशेष म्हणजे शालेय गटातील सर्व पदक विजेते एलआरव्हीएन शाळेचेच असल्याने संस्थेच्या प्रशिक्षणपद्धतीची परिणामकारकता अधोरेखित झाली.
कोनसरी येथील अकादमीच्या खेळाडूंनीही डिस्टन्स आणि इंडिव्हिज्युअल प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी केली. सौरभ राऊत याने अंडर-15 मुलांच्या गटात कांस्यपदक मिळवले, तर गौरी गावतुरे हिने डिस्टन्स प्रकारात द्वितीय आणि इंडिव्हिज्युअल प्रकारात तृतीय क्रमांक मिळवून सातत्य दाखवले.
या यशामागे संरचित प्रशिक्षण, व्यावसायिक मार्गदर्शन, आधुनिक क्रीडा सुविधा आणि शिस्तबद्ध सरावपद्धतीचा मोठा वाटा असल्याचे स्पष्ट होते. ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याच्या ध्येयातून लॉयड्सकडून सातत्याने गुंतवणूक करण्यात येत आहे. व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या दूरदृष्टीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक सुविधांचे सकारात्मक परिणाम आता पदकांच्या रूपाने समोर येऊ लागले आहेत.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून राज्यस्तरावर झेपावणारे हे खेळाडू केवळ संस्थेचे नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत आहेत. योग्य संधी, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विश्वास मिळाल्यास ग्रामीण प्रतिभाही राष्ट्रीय पातळीवर झळकू शकते, याची ही ठोस नांदी मानली जात आहे.

