Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरी पोलिसांकडे महागाव खु. येथील विक्रेत्यांची यादी सादर

-मुक्तिपथ गाव संघटनेचा पुढाकार

0

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द येथील दारू विक्रेत्यांवर वारंवार कारवाई करूनही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यामुळे त्रस्त झालेल्या मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी अहेरी पोलिस स्टेशन गाठून निवेदन सादर करीत दारूविक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
महागाव खुर्द येथील अवैध दारूविक्री थांबविण्यासाठी मुक्तिपथ च्या मार्गदर्शनाखाली गाव संघटेनच्या महिलांसह ग्रामस्थांनी प्रयत्न सुरु केले आहेत. गावात दारूविक्री बंदीचा निर्णय घेऊन विक्री करताना आढळून आल्यास दंडाची तरतुदी केली आहे. एवढेच नव्हे तर महिलांनी अहिंसक कृती करीत विक्रेत्यांचा मोठ्या प्रमाणात मुद्देमाल नष्ट केला आहे. गावातुन अवैध दारूविक्री हद्दपार व्हावी यासाठी गावातील महिलांकडून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु गाव व परिसरातील काही मुजोर दारूविक्रेते चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत असल्याने ग्रामस्थांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.
दारूविक्रीमुळे गावातील शांतता व सुव्यवस्था भंग झाली आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. व्यसनाच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. ही गंभीर समस्या गावातून दूर करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. दारूविक्री तत्काळ बंद करण्याची सूचना देखील देण्यात आली आहे. तरीसुद्धा विक्रेत्यांनी आपला व्यवसाय सुरुच ठेवला आहे. त्यामुळे गावातील महिलांनी अहेरी पोलिस स्टेशन गाठून आपल्या गावातील विक्रेत्यांची यादी पोलिसांना सादर करीत विक्रेत्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.