Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार वितरण सोहळा पूर्वतयारी

इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम करु- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अलिबाग, 11 एप्रिल :- महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार आदरणीय अप्पासाहेबांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवार,दि.16 एप्रिल 2023 रोजी कॉर्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे आयोजित सोहळ्यात वितरित केला जाणार आहे, यामुळे या महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढणार आहे. म्हणूनच माझ्यासह सर्वांनी झोकून देऊन काम करूया, इतिहासात नोंद घेतली जाईल, ना भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम करु, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खारघर येथे केले.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण 2022 पुरस्कार वितरण पूर्वतयारी आढावा बैठक नवी मुंबई, खारघर येथील कॉर्पोरेट पार्क मैदानात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार भरत गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, कोकण परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, नवी मुंबई आयुक्त राजेश नार्वेकर, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, रायगड जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, उपायुक्त तिरुपती काकडे, पंकज भुसाने, सांस्कृतिक संचालनालय सहसंचालक श्रीराम पांडे आदि मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, येत्या १६ एप्रिल रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा आदरणीय आप्पासाहेबांना सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे नियोजन काळजीपूर्वक व्हावे. शासनाची आणि प्रशासनाची ही सर्वस्वी जबाबदारी आहे, त्यांना सदस्य सहकार्य करण्यासाठी सज्ज आहेत. ते म्हणाले, कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक महानगरपालिकेने उपायुक्त दर्जाचा अधिकारी प्रत्येक गोष्टीसाठी समन्वय राखण्यासाठी नेमावा. सर्वच घटकांनी जबाबदारीचे भान ठेवून दिलेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडावी अंदाजे वीस लाखांपेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता, पिण्याचे पाणी, शौचालय या व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिले जावे, असे सूचित केले.

पोलिसांना सूचना देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्था त्याचप्रमाणे पार्किंगचीही योग्य ती व्यवस्था करावी, पोलिसांबरोबर ट्राफिक वॉर्डननाही या व्यवस्थेत सहभागी करून घ्यावे, पस्तीस ते चाळीस हजार वाहने या ठिकाणी येण्याची शक्यता, त्यामुळे त्याबाबतही योग्य ती खबरदारी घेण्यात यावी, लोकांची कार्यक्रमाच्या ठिकाणी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी व्यवस्थित काळजी घ्यावी,असे सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नवी मुंबई आणि पनवेल महानगरपालिका यांची विशेष जबाबदारी आहे, आरोग्य यंत्रणेने आवश्यक ती सर्व तयारी चोख ठेवावी, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय पथके यांनी पूर्ण तयारी ठेवावी,असे सांगून मुख्यमंत्र्यांनी इतक्या तातडीने आपण बैठक घेत आहोत याबाबत सर्वांनी गांभीर्याने विचार करावा आणि त्याप्रमाणे काटेकोर नियोजन करून कार्यक्रम यशस्वी, शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सज्ज होऊया, या दिमाखदार कार्यक्रमासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासित उद्गार शेवटी काढले. आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी कार्यक्रम ज्या मैदानात होणार आहे त्या मैदानाची व तेथील इतर व्यवस्थांची पाहणी केली तसेच उपस्थित अधिकाऱ्यांशी मैदानातील व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.

हे पण वाचा :-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.