Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, दि. ९ – राज्यातील शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले परिवर्तन घडू शकते. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकविण्यावर भर द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.

येत्या १०० दिवसात करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पणन मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर साकोरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव आदी यावेळी उपस्थित होते. प्रधान सचिव देओल यांनी सादरीकरणाद्वारे विभागाच्या आराखड्याची माहिती दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, शासनाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांना घडविणारे उत्कृष्ट शिक्षक ही मोठी संपत्ती आहे, त्यांचा इतरांसाठी आदर्श म्हणून उपयोग करा. वेळोवेळी उपयुक्त ठरणाऱ्या शाळा, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या माहितीकरिता शाळा आणि शिक्षकांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी ही माहिती डिजिटल स्वरूपात एकत्र करा. पूर्व प्राथमिक शिक्षणाची नोंदणी करून त्यांना कमीत कमी कोणत्या बाबी आवश्यक असाव्यात हे सांगून त्यांना प्रमाणपत्र द्या, पालकांचा विश्वास रहावा यासाठी हे प्रमाणपत्र त्यांनी दर्शनी भागात लावण्याची अट असावी, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विद्यार्थिनींना सायकल वाटप केल्यामुळे त्यांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढल्याचे सिद्ध झाले आहे. ही योजना सुरू राहावी, असे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवसाचे स्वागत करा. यासाठी सर्व मंत्री, सचिव यांच्यासह मान्यवरांना पहिल्या दिवशी शाळेत जाण्यासाठी सूचित करा. समूह शाळा ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि आवश्यक बाब आहे. तथापि, कमी संख्या असणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना समूह शाळांमुळे होणारे लाभ योग्य प्रकारे समजावून सांगा, असे निर्देश त्यांनी विभागाला दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी बोलताना येत्या १०० दिवसात करावयाच्या उपाययोजनांचा आराखडा सादर केला. प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणार असल्याचे ते म्हणाले. शाळा परिसर आणि विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, नीटनेटकेपणा, सीबीएसई पॅटर्न चा अंगीकार करून त्यात राज्याप्रमाणे आवश्यक बदल करणे, शाळांना गुणवत्तेनुसार रँकिंग देणे, एका केंद्रात किमान एका शाळेमध्ये दहावीपर्यंत शिक्षण व्यवस्था निर्माण करून त्या शाळा आदर्श तर त्यातील एक वर्ग स्मार्ट वर्ग करणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यावर भर देणार असल्याचे ते म्हणाले.

मंत्री भुसे म्हणाले, उच्च शिक्षणामध्ये मराठी शाळेतील विद्यार्थी उत्कृष्ट कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना शालेय जीवनात शाळांमध्ये उत्कृष्ट भौतिक सुविधा मिळाव्यात यासाठी कोणकोणत्या विभागामार्फत निधी उपलब्ध होईल त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्व निधीचा योग्य वापर करता येईल, त्याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांना आदर्श बनवून त्यांच्या प्राविण्याला प्रोत्साहन दिले जाणार असल्याचे ते म्हणाले. सर्व मान्यवरांनी आपल्या भागातील एक शाळा दत्तक घेऊन त्या शाळेच्या उन्नतीसाठी नियमित भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तर, दीर्घकालीन उपाययोजनांबाबत बोलताना, वीटभट्ट्यांवर जाणारे, ऊसतोड कामगार तसेच शेतीकाम करणाऱ्यांच्या शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी नियोजन करणार असल्याचेही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी सांगितले. संस्थाचालक आणि शिक्षक यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून त्यातून निघालेले सकारात्मक निष्कर्ष स्वीकारुन काम करणार असल्याचे ते म्हणाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.