Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीच्या जनतेसाठी ‘महायज्ञ’: काँग्रेसकडून मुख्यमंत्र्यांच्या ‘उपेक्षा-पालकत्वा’विरोधात अनोखे आंदोलन

रानटी हत्ती, शेतीचे नुकसान, अपुऱ्या सुविधा आणि दुर्लक्षित मागण्या घेऊन सेमाना देवस्थानात ६ जूनला महायज्ञाचे आयोजन...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रवि मंडावार, गडचिरोली, १ जून : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त आणि विकासाच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारले, पण प्रत्यक्ष सहभाग मात्र अत्यल्पच राहिल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जिल्ह्यातील दीर्घकालीन आणि ज्वलंत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने ६ जून रोजी गडचिरोली शहरातील सेमाना देवस्थान येथे ‘महायज्ञा’चे आयोजन केले आहे. या प्रतीकात्मक यज्ञाच्या माध्यमातून काँग्रेसकडून मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘दखल घ्या’ असा साकडे घालण्यात येणार आहे.

पालकत्व केवळ कागदावरच?

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीसारख्या संवेदनशील आणि मागास जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याची घोषणा मोठ्या गाजावाजात केली होती. या निर्णयामुळे जिल्ह्यातील जनतेत एका नव्या अपेक्षेचा किरण जागवला गेला. मात्र, ही घोषणा प्रत्यक्ष अंमलात उतरताना कुठे हरवली, हे अद्याप नागरिकांसाठी कोडेच ठरले आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून जिल्ह्यातील स्थानिक समस्या डोंगराएवढ्या उभ्या आहेत, पण मुख्यमंत्री आणि पालकमंत्री या दोन्ही भूमिकांतील देवेंद्र फडणवीस यांचा या प्रश्नांकडे कोणताही थेट हस्तक्षेप दिसून आलेला नाही.

गडचिरोली जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी यावर टीकास्त्र सोडत म्हटले की, “पालकत्व हे केवळ गौरवपद नसून ती जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. परंतु मुख्यमंत्री फडणवीस यांचे पालकत्व केवळ कागदोपत्रीच उरले असून, प्रत्यक्षात ते जिल्ह्याच्या प्रश्नांशी संवाद साधायला तयार नाहीत. ना जनतेशी थेट संवाद, ना प्रशासनावर ठोस पकड — अशा अवस्थेत जिल्हा नियतीच्या भरवशावर राहिला आहे.”

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

रानटी हत्तींचा धुमाकूळ आणि वाढते नैसर्गिक संकट..

गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी गेली तीन वर्षं ही केवळ हवामानाच्या तडाख्याची नाही, तर जंगलातून येणाऱ्या संकटांचीही कहाणी ठरली आहे. रानटी हत्तींचा उच्छाद हा इथल्या शेतकऱ्यांसाठी नित्याचा शापच बनला आहे. रात्र झाली की झोप कुठे आणि शेतकऱ्यांचं घर कुठे हेही कळेनासं झालं आहे. या हत्तींबरोबरच आता वाघ आणि अस्वलसुद्धा मानवी वस्त्यांमध्ये मुक्तपणे फिरू लागलेत. जंगलातून गावात आलेल्या या संकटामुळे गावकऱ्यांचं अंगण आता भीतीचं ठिकाण बनलं आहे.

शेतातल्या उभ्या पिकांवर क्षणात चिरमोड करून जाणारे हत्ती, रात्रीच्या शांततेत येणारा वाघाचा डरकाळा आणि झुडपात दबा धरून बसलेलं अस्वल — या तिढ्याने ग्रामीण जनजीवन हादरून गेलं आहे. फक्त शेताचंच नाही, तर मेंढ्या, गुरं, घरं आणि कित्येकांचे जीवही या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये गेले आहेत. पण प्रशासन मात्र आजही पंचनाम्याच्या कागदांमध्ये अडकलेलं आहे.

या भीतीच्या सावटावरून डोकं वर काढतो तो दुसरा संकटांचा वावटळ – अवकाळी पावसाचा. पेरणीच्या हंगामात पाऊस लपताछपताच येतो आणि नंतर आभाळ कोरडं राहतं. विजेचा पुरवठा अपुरा, पाण्याचा तुटवडा आणि त्यात भर म्हणजे शासनाच्या भरपाई योजना वेळेवर पोहोचत नाहीत. परिणामी शेतकऱ्यांचं अर्थकारणच कोलमडलं आहे.

दिवसाला दोन वेळा जेवण मिळावं की नाही याची चिंता करणारा शेतकरी, आता आपलं शेतच सुरक्षित नाही यामुळे अस्वस्थ आहे. हे विशेष दुःखदायक आहे.

गडचिरोलीत समस्या डोंगराएवढ्या, उपाय मात्र अदृश्यच!

रानटी हत्ती, वाघ आणि अस्वलांचा धुमाकूळ, अवकाळी पाऊस, अपुरा वीजपुरवठा आणि भरपाई योजनांचा अभाव यामुळे गडचिरोलीतील शेतकरी उध्वस्त झाला आहे. अवजड वाहतुकीमुळे अपघात वाढले असून, वाळूच्या काळाबाजारामुळे घरकुल योजना अडकली आहे. शेतजमिनींच्या अधिग्रहणात पारदर्शकतेचा अभाव असून, स्थानिकांना न्याय मिळत नाही.

मनरेगाच्या थकीत मजुरीपासून ते कंत्राटदारांच्या देयकांपर्यंत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पावसाळ्यात तुटणारा संपर्क, खस्ता रस्ते, अपुरी आरोग्य सेवा आणि स्थानिकांना न मिळणारा रोजगार यामुळे संताप वाढत आहे.

जिल्ह्यातील समस्यांचा डोंगर वाढतोय, पण त्याकडे पाहणारी डोळ्यांतली जबाबदारी मात्र कुठेच दिसत नाही, अशी जनतेची खदखद आहे.

यज्ञा’मधून राजकीय संदेश..

काँग्रेसने या यज्ञाचे वर्णन ‘प्रतिकात्मक आंदोलन’ म्हणून केले आहे. “प्रसिद्धीपेक्षा परिणाम महत्त्वाचा. आम्ही देवासमोर नव्हे, तर शासनासमोर साकडे घालतो आहोत,” असे ब्राम्हणवाडे यांनी स्पष्ट केले. प्रशासनाचे दुर्लक्ष, आणि पालकमंत्र्यांची अनुपस्थिती – हेच या आंदोलनाचे केंद्रबिंदू असतील.

सोशल मीडियावर चर्चेचा विषय..

काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू आहे. काहींनी याला भावनिक आंदोलन म्हणत समर्थन दिले, तर काहींनी ‘यज्ञाने प्रश्न सुटतात का?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. मात्र, शासनाने याची गंभीर दखल घेणे आवश्यक असल्याचे मत गडचिरोली जिल्ह्यातील समस्त नागरिकांनी व्यक्त केले आहे

Comments are closed.