गडचिरोलीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची वाहतूक उधळली…
९.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: महाराष्ट्र शासनाने विक्री व वाहतूक प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावली आहे. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत ५.४४ लाख रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू आणि ३.८० लाख रुपयांचे इनोव्हा चारचाकी वाहन असा एकूण ९.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील अवैध तंबाखू, दारू, जुगार आणि अन्य बेकायदेशीर व्यवसायांवर पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून, २२ एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अर्जुनी – देसाईगंज मार्गावरून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा पुरवठा होणार असल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने अर्जुनी ते देसाईगंज मार्गावर सापळा रचून तपासणी सुरू केली. दरम्यान, टोयोटा इनोव्हा (MH-15-BN-5689) ही सिल्व्हर रंगाची चारचाकी संशयास्पदरीत्या येताना दिसली. वाहन अडवून तपासणी केली असता त्यामध्ये ५,४४,३०४ रुपये किंमतीची सुगंधित तंबाखू आढळली.
वाहनचालकाने आपले नाव अस्पाक मुन्ना शेख (वय २५, रा. संजयनगर, पिंडकेपार, जि. गोंदिया) असे सांगितले. पुढील चौकशीत, तंबाखू गोंदिया येथील रवी मोहनलाल खटवानी याची असल्याचे त्याने कबूल केले.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोली यांच्या तक्रारीवरून देसाईगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १८८/२०२५ नोंदवण्यात आला असून, आरोपींवर IPC कलम ३(५), २७५, २७४, २२३, १२३ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर हे करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात पार पडली. पथकात सरीता मरकाम, दीपक लेनगुरे, प्रेमानंद नंदेश्वर, सचिन घुबडे, निशिकांत अलोणे आणि निकेश कोडापे यांचा समावेश होता.
गडचिरोली पोलिसांची ही कार्यवाही जिल्ह्यातील अवैध तंबाखू व्यवसायाविरोधात मोठा इशारा मानला जात असून, अशा स्वरूपाच्या गुन्ह्यांवर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Comments are closed.