Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अबुजमाडमध्ये मोठी कारवाई; २५ लाखांच्या इनामी प्रभाकरसह सात जहाल माओवादी ठार, वीर जवान दीपक मडावी अमर

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : अबुजमाडच्या घनदाट जंगलात सुरक्षा दलाने राबविलेल्या सलग तीन दिवसांच्या व्यापक नक्षलविरोधी अभियानात मोठे यश मिळवत गडचिरोली पोलीस दलाने सात जहाल माओवाद्यांचा खात्मा केला आहे. या कारवाईत सीपीआय (माओवादी) संघटनेच्या कंपनी क्रमांक १० चा प्रभारी तसेच वेस्ट सब-झोनल ब्युरोचा महत्त्वाचा कमांडर प्रभाकर (रा. कामारेड्डी, तेलंगणा) याचाही समावेश असून त्याच्यावर तब्बल २५ लाखांचे बक्षीस जाहीर होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुरक्षा दलाच्या कारवाईदरम्यान काल रात्रीपर्यंत तीन माओवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले होते. त्यानंतर आज दिवसभर सुरू असलेल्या सर्चिंग मोहिमेत आणखी चार माओवाद्यांचे मृतदेह सापडले. या कारवाईत एकूण सात माओवादी (चार पुरुष व तीन महिला) ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. घटनास्थळावरून तीन ए.के.-४७, एक एसएलआर आणि एक .३०३ रायफल अशी पाच अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. उर्वरित मृत माओवाद्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, या भीषण चकमकीत सी-६० पथकातील शूर जवान दीपक चिन्ना मडावी (वय ३८, रा. अहेरी) यांनी अतुलनीय शौर्य दाखवत दोन माओवाद्यांना ठार केले होते. मात्र, चकमकीदरम्यान लागलेल्या गोळीमुळे ते गंभीर जखमी झाले. हेलिकॉप्टरद्वारे त्यांना तातडीने भामरागड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्यांना वीरगती प्राप्त झाली. शहीद जवान दीपक मडावी यांच्यावर उद्या त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या कारवाईत सी-६० पथकातीलच जवान जोगा मडावी (रा. किष्ट्यापल्ली) हे देखील जखमी झाले होते. त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून गडचिरोली येथे उपचारासाठी हलविण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सदर कारवाईनंतर अबुजमाड परिसरात सुरक्षा दलाची सर्चिंग मोहीम अजूनही सुरू असून ठार झालेल्या माओवाद्यांची ओळख व अभियानासंदर्भातील सविस्तर माहिती गडचिरोली पोलीसांकडून आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे.

अबुजमाडच्या दुर्गम आणि आव्हानात्मक भूभागात मिळविलेल्या या यशामुळे नक्षलविरोधी लढ्याला मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे, तर दुसरीकडे शहीद जवान दीपक मडावी यांच्या बलिदानाने संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.