राज्यस्तरीय ‘सक्षम आदिवासी महिला’ पुरस्काराने गडचिरोलीच्या मनीषा मडावी यांचा गौरव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 11 ऑगस्ट – आदिवासी समाजातील सांस्कृतिक जपणूक, महिलांचे सबलीकरण आणि कला परंपरेच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रसारासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीय मानवाधिकार संघटनाच्या जिल्हाध्यक्षा मनीषा मडावी यांना राज्य सरकारचा ‘विरांगणा राणी दुर्गावती सक्षम आदिवासी महिला’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
हा सन्मान 9 ऑगस्ट 2025 रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्त नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे आयोजित ‘विरांगणा राणी दुर्गावती आदिवासी महिला सबलीकरण व सक्षमीकरण मेळावा’ या कार्यक्रमात, राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.
मनीषा मडावी यांनी अल्पावधीतच विविध क्षेत्रांत लक्षणीय कामगिरी करत अनेक मानाचे किताब पटकावले आहेत. त्यामध्ये मिस इंडिया 2021, मिसेस महाराष्ट्र 2022, सुपर मॉडेल रॅम्प वॉक टायटल ऑफ इंडिया 2022, फिनिक्स पुरस्कार 2023, आदिवासी महिला नवरत्न पुरस्कार, मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण पुरस्कार, गडचिरोली गौरव पुरस्कार 2021, आदिवासी समाज भूषण पुरस्कार 2022, आणि कलारत्न पुरस्कार 2023 यांचा समावेश आहे.
आदिवासी परंपरा व संस्कृती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविण्याच्या उद्देशाने त्यांनी गडचिरोलीत ‘कोया किंग’ आणि ‘कोया क्वीन’ या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले, ज्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली. या कार्यामुळे त्या आदिवासी समाजातील महिला व तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात.
या सन्मानाबद्दल राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रणय खुणे, उपाध्यक्ष डॉ. भारत खटी, प्रवक्ता ग्यानेंद विश्वास, राष्ट्रीय महिला आघाडी अध्यक्षा पौर्णिमा विश्वास, विदर्भ कार्यकारी अध्यक्ष नेताजी सोदोंरकर, विदर्भ अध्यक्ष जावेद सैय्यद, जिल्हा अध्यक्ष रमेश अधिकारी, जिल्हा सचिव प्रकाश थुल, जिल्हा उपाध्यक्ष नानु उपाध्ये, बाळू माडुरवार, तालुका अध्यक्ष कालिदास बन्सोड, भीमराव वनकर, तालुका अध्यक्षा रुपाली कावळे, तसेच विशाखा सिन्हा यांनी राज्य सरकारचे आभार मानले आणि मनीषा मडावी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.