पावसाळी अधिवेशनाची सांगता: विधानपरिषदेत १५ बैठका, १०५ तासांचं कामकाज — हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून नागपूरात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, १९ जुलै : राज्य विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज औपचारिक समारोप झाला. सभागृहाचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी अधिवेशनाच्या कामकाजाचा आढावा सादर करतानाच, यंदाच्या अधिवेशनात झालेल्या चर्चांपासून विधेयकांपर्यंतची सविस्तर माहिती दिली. एकूण १५ बैठका आणि १०५ तासांचं प्रभावी काम झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दररोज सरासरी सात तास कामकाज झालं, हे यंदाच्या अधिवेशनाचं वैशिष्ट्य ठरलं.
मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे सभागृहाचा १ तास २ मिनिटे आणि इतर कारणांमुळे ४४ मिनिटांचा वेळ वाया गेल्याची कबुलीही सभापतींनी दिली. मात्र, चर्चेचा दर्जा आणि सहभाग सकारात्मक राहिल्याचा उल्लेख त्यांनी विशेषत्वाने केला.
यंदा विधानपरिषदेस एकूण ८८५ लक्षवेधी सूचना प्राप्त झाल्या. त्यापैकी २०२ सूचना मान्य करण्यात आल्या आणि ७९ विषयांवर प्रत्यक्ष सभागृहात चर्चा झाली. तारांकित प्रश्नांची संख्या तब्बल २३५४ इतकी होती, त्यापैकी ४९३ प्रश्नांना मान्यता मिळाली आणि केवळ ८१ प्रश्नांना प्रत्यक्ष उत्तर मिळालं.
विधानसभेकडून पारित झालेली एकूण १२ विधेयके यंदाच्या अधिवेशनात विधानपरिषदेत मंजूर करण्यात आली. याशिवाय २ विधेयकांना पुनरस्थापित केलं गेलं, तर ३ धन विधेयके शिफारशीशिवाय परत पाठवण्यात आली असल्याची माहितीही सभापतींनी दिली.
अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या सुरावटीत सभागृहाचं कामकाज संस्थगित करण्यात आलं. यानंतर, पुढील अधिवेशनाची घोषणाही झाली. राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन येत्या ८ डिसेंबर २०२५ पासून नागपूर येथे होणार असल्याचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केलं.
या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात चर्चेपासून विधेयकांपर्यंत आणि प्रश्नोत्तरांपासून शासनावर घेतलेल्या प्रश्नांची धार यामुळे जनतेच्या प्रतिनिधींच्या भूमिकांवर नव्या चर्चेला वाव मिळाल्याचं पाहायला मिळालं. हिवाळी अधिवेशनात या चर्चांना कोणता वेग मिळतो, याकडे आता सर्वांचं लक्ष लागले आहे.
Comments are closed.