Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दहशतीची स्मारके’ एकाच दिवशी जमीनदोस्त; ८०० जवानांचे समन्वित अभियान

एकाच दिवशी ४४ स्मारकांचे उच्चाटन ही केवळ कारवाई नसून, गडचिरोलीत बदलत्या सुरक्षापरिस्थितीची घोषणा मानली जात आहे.

0

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आलेली जिल्हाभरातील ४४ माओवादी स्मारके गडचिरोली पोलिस दल व Central Reserve Police Force (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त कारवाईत बुधवारी एकाच दिवशी उध्वस्त करण्यात आली. सी-६०, बीडीडीएस, विशेष अभियान पथक आणि विविध पोलीस स्टेशन/उपपोलीस स्टेशन/पोलीस स्टेशन केंद्र येथील एकूण १८ पथकांतील सुमारे ८०० जवानांनी दुर्गम जंगल पट्ट्यात राबविलेल्या व्यापक शोध-अभियानातून ही कारवाई पार पडली.

दुर्गम आणि अतिदुर्गम भौगोलिक रचनेमुळे दीर्घकाळ माओवादी चळवळीचे सावट राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यात, जनतेच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी आणि स्वतःचे अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी माओवादी संघटनांकडून विविध ठिकाणी स्मारके उभारली जात होती. मात्र, गेल्या काही वर्षांत पोलिसांनी राबविलेल्या सातत्यपूर्ण माओवादविरोधी मोहिमांमुळे चळवळीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात क्षीण झाला आहे. उरलेली ही स्मारके म्हणजे दहशतीच्या कालखंडाची प्रतीके होती. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम हाती घेण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अभियानादरम्यान १५ पोलीस स्टेशन/उपपोलीस स्टेशन/पोलीस मदत केंद्र हद्दींमध्ये पसरलेल्या एकूण ४४ स्मारकांचा शोध घेण्यात आला. बीडीडीएस पथकांनी प्रथम परिसराची सखोल तपासणी करून कोणतीही स्फोटके किंवा सापळे नसल्याची खात्री केली. त्यानंतर जवानांनी ही स्मारके नियंत्रित पद्धतीने जमीनदोस्त केली. एटापल्ली उपविभागात १८, हेडरी उपविभागात १७, भामरागड उपविभागात ५, जिमलगट्टा उपविभागात २, धानोरा आणि पेंढरी उपविभागात प्रत्येकी १ अशी एकूण ४४ स्मारकांचा समावेश होता. पेनगुंडा, कवंडे, तुमरकोठी, गर्देवाडा, वांगेतुरी, गट्टा (जां.) यांसारख्या अतिदुर्गम भागांतील कारवाई विशेष लक्षवेधी ठरली.

पोलिसांच्या मते, ही केवळ भौतिक रचना नव्हती; तर हिंसाचार, धमकी आणि दहशतीच्या मानसिक प्रभावाची चिन्हे होती. त्यांचे उच्चाटन म्हणजे ग्रामस्थांच्या मनातील भीतीचे आवरण दूर करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या कारवाईनंतर संबंधित भागांत सुरक्षेचे वातावरण अधिक दृढ झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

ही मोहीम पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोेजे आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्पष्ट केले, “जिल्ह्यातील माओवादी चळवळ जवळपास संपुष्टात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि विकासाच्या प्रवाहात अडथळा ठरणाऱ्या कोणत्याही दहशतीच्या प्रतीकांना आम्ही स्थान देणार नाही. कोणीही माओवाद्यांच्या भूलथापांना बळी पडू नये; पोलिस दल नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.