नक्षली दहशतीच्या “त्या” सावल्या; कवंडेत उभ्या स्मृती… एक हरवलेलं वास्तव..पण मनातील दहशत अजून शाबूत!…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
✍️ ओमप्रकाश चुनारकर,
गडचिरोली : दाट अरण्यांची कुशीत विसावलेलं भामरागड तालुक्यातील शेवटचे गाव कवंडे…आणि छत्तीसगडच्या सीमेलगत महाराष्ट्राचा शेवटचा टप्पा. पण हे शेवटचं गाव केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचं नाहीतर इथे उभ्या असलेल्या नक्षलवाद्यांच्या स्मारकांमध्ये दडलेली आहे एका काळाच्या दहशतीची अनोळीव साक्ष आहे.
ही स्मारके फक्त दगडाचे थडगे नाहीत. ती आहेत एका काळाच्या वर्चस्वाची, हिंसेच्या छायांची आणि स्थानिक लोकांच्या मनांवर अधिराज्य गाजवणाऱ्या भीतीची शिल्पं.
स्मारकांचे बोलके अस्तित्व..
दरवर्षी २८ जुलै ते ३ऑगस्ट दरम्यान साजरा होणाऱ्या ‘शहीद सप्ताहा’च्या निमित्ताने नक्षलवादी त्यांच्या ‘मृत सहकाऱ्यांच्या’ स्मृती जपत नव्या स्मारकांची उभारणी करतात. या स्मारकांमागचा उद्देश श्रद्धांजलीपेक्षा अधिक काही असतो — तो म्हणजे, मनांवर दहशतीचा ठसा कायम ठेवणं.
भामरागड तालुक्यातील धोडराज पलीकडे, कवंडे परिसरात आजही अशी स्मारके मोकळ्या मैदानात दिसतात. ही दृश्ये आजच्या शांततेच्या दाव्याला सावध प्रश्न विचारतात — “खरंच सगळं निवळलं आहे का?”
शांततेकडचा प्रवास : पोलिसांचं धाडसी पाऊल..
गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने आणि गडचिरोली पोलिस दलाने छत्तीसगड सीमेलगत सात पोलीस ठाण्यांची यशस्वी उभारणी केली. वांगेतुरी, पेनगुंडा, नेलगुंडा, गर्देवाडा आणि कवंडे – ही ठिकाणं आता पोलिसांच्या स्थायीत्वामुळे एका नव्या विश्वासाच्या वर्तुळात आली आहेत. पूर्वी नक्षल चकमकीनंतर नक्षलवादी सुरक्षितपणे छत्तीसगडमध्ये पळ काढत. आज, सीमांच्याही सीमा कडक झाल्या आहेत. नक्षलवाद्यांचा ‘सेफ झोन’ असलेला कवंडे आता पोलिसी बंदोबस्तात ‘स्टेट स्ट्रॉंगहोल्ड’ बनतो आहे.
अबुजमाड : नक्षलवादाची अघोषित राजधानी, अनभिज्ञ भूमीतील उगम..
अबुजमाड — एक अदृश्य प्रदेश, एक नकाशाविरहित वास्तव. छत्तीसगड, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवर पसरलेला हा विस्तीर्ण वनक्षेत्र म्हणजे निसर्गाच्या सौंदर्यापेक्षा अधिक, हिंसेच्या गूढ इतिहासाचं केंद्रबिंदू. ना रस्त्यांची सुसंगती, ना दळणवळणाची साधनं. येथे आजही हजारो आदिवासी कुटुंबं मूलभूत सुविधा न मिळालेल्या, शासनाच्या नकाशावर नोंद नसलेल्या गावांमध्ये राहत आहेत. याच असंवेदनशीलतेतून नक्षलवाद रुजला, फोफावला आणि बळकट झाला.
अबुजमाड हे नक्षल चळवळीचं तंत्र, रणनीती आणि नेतृत्व घडवणारं कुशाग्र केंद्र राहिलं आहे. याच परिसरात सीपीआय (माओवादी) या संघटनेचा पोलिटब्युरो सदस्य बसवराजू (उर्फ चेड्डा), केंद्रीय समिती सदस्य सुधाकर आणि तेलंगणाच्या राज्य समितीतील कुख्यात नेते भास्कर यांचा दबदबा होता. या तिघांची अलीकडील कारवायांमध्ये झडप घालून सुरक्षा दलांनी निष्प्रभ केले, ही नक्षल नेटवर्कसाठी केवळ सैनिकी नव्हे तर रणनीतिकरीत्या देखील मोठी तडाखा ठरली आहे.
छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या पोलिस दलांनी केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली एका संयुक्त समन्वयाच्या धर्तीवर ‘हॉट परस्यूट ऑपरेशन्स’ राबवले. यामध्ये अबुजमाडच्या गहन जंगलात २१ दिवसांचा संयुक्त छापामार मोहीम करून छत्तीसगड पोलिसांनी ३१ नक्षल्यांचा खातमा केला. त्याच मोहिमेचा परिणाम म्हणून, इंद्रावती नॅशनल पार्कजवळ बसवराजूला ठार करण्यात आलं. त्यानंतर लागोपाठ सुधाकर आणि भास्कर यांचाही खात्मा झाला.
या कारवायांमुळे अबुजमाड परिसरात नक्षल नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मागील दोन दशके ज्यांनी नक्षल चळवळेला दिशा दिली, त्यांचं अचानक लोप पावणं ही संघटनेच्या गटात अस्वस्थता आणि विघटनाचं लक्षण मानलं जात आहे.
“कवंडे हे राज्याचं शेवटचं नव्हे, तर विकासाची सुरुवात असलेलं प्रवेशद्वार आहे,”..
गडचिरोलीच्या सर्वांत दुर्गम आणि संवेदनशील परिसरातील पेनगुंडा, नेलगुंडा आणि कवंडे ही गावं — नकाशावर जरी ओळख निर्माण करत असली, तरी वास्तविकतेत ती अजूनही राज्यव्यवस्थेच्या काठावरच उभी आहेत. या गावांमध्ये नदी-नाल्यांवर पूल सध्या सुरू होत आहेत तर ठिकाणी प्रस्तावित असून येणाऱ्या काळात होतील यासाठी राज्य शासन आग्रही आहेत, तर दुसरीकडे आरोग्य केंद्रांमध्ये औषधं नाहीत, तर शिक्षण आणि रोजगाराच्या संधी फारशा उपलब्ध नाहीत. काही भागात फोरजी टॉवर उभे राहतायत, पण त्याच्या सिग्नलमध्ये न डॉक्टर सापडतात, न रोजगाराच्या संधी. ही दैनंदिन विसंगती इथल्या जीवनशैलीचा भाग बनली आहे.
याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच कवंडे गावात थेट भेट देऊन स्थानिक जनतेशी संवाद साधला. “कवंडे हे राज्याचं शेवटचं नव्हे, तर विकासाची सुरुवात असलेलं प्रवेशद्वार आहे,” अशा शब्दांत त्यांनी नवी आशा पेरली. मात्र इथल्या नागरिकांसाठी ही भेट एक औपचारिकता नव्हे, तर दशकांपासून लांबलेला विकास प्रत्यक्ष अनुभवण्याची प्रतीक्षा आहे. या भागातील जनतेच्या मनात प्रश्न स्पष्ट आहे — ही भेट निवडणुकीपूर्वीची घोषणा ठरेल की कृतीपूर्वक विकासाची सुरूवात?
कारण विकास ही फक्त योजना नसते, ती विश्वासाची पुनर्निर्मिती असते. कवंडे आणि आजूबाजूची गावं म्हणजे शासनाच्या संवेदनशीलतेची आणि व्यवस्थेच्या कर्तबगारीची कसोटी आहे. फडणवीस सरकारने घेतलेली ही प्रतिज्ञा जर कृतीत उतरली, तर ही गावं नुसती नकाशावरच नव्हे, तर राज्याच्या विकासदृष्टीकोनात खऱ्या अर्थाने सामील होतील. अन्यथा कवंडे पुन्हा एकदा विकासाच्या उंबरठ्यावर उभं राहून आशेच्या सावलीत वाट पाहत राहील…
स्मारकं उद्ध्वस्त झाली… पण मनांतील दहशत अजूनही संपलेली नाही!
भामरागडच्या सीमावर्ती भागात असलेल्या कवंडे परिसरात उभारलेली नक्षलवादी स्मारकं आता पोलीस दलाच्या कडक कारवाईने जमीनदोस्त झाली आहेत. ही एक महत्त्वाची सुरुवात आहे — पण ती केवळ भौतिक अस्तित्वाचा अंत दर्शवते, मानसिक बंधनांचा नाही. कारण खरी दहशत स्मारकांच्या सिमेंटमध्ये नसते, ती लोकांच्या स्मरणांमध्ये, अनुभवांमध्ये आणि दिवसेंदिवस भोगलेल्या वास्तवात खोलवर रूजलेली असते.
ही दहशत ना केवळ बंदुकीने नष्ट होते, ना केवळ बंदोबस्ताने थांबते. ती कमी होते – जेव्हा एखाद्या आईला वेळेवर आरोग्यसेवा मिळते; जेव्हा एखादं मूल जंगल फोडत नाही, तर शाळा गाठतं; जेव्हा नकाश्यावर गावाचं नाव दिसतं तेवढ्यापुरतं नाही, तर त्या गावात रस्ता, वीज, पाणी आणि रोजगाराचं नाव ठरतं.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे – जेव्हा शासन लोकांशी नुसता संवाद साधत नाही, तर त्यांचा विश्वासही मिळवतं.
दहशतीचं खरे उच्चाटन स्मारक पाडण्यात नसून — नव्या आशांचा पाया घालण्यात असतं. ही आशा पेरण्यासाठी बंदुकांइतकाच महत्त्वाचा घटक आहे विकास. आणि तो विकास तात्कालिक जाहिरातींपेक्षा अधिक खोल, अधिक सुसंगत आणि अधिक मानवी असावा लागतो. स्मारकं पडली, आता मनांमधली भीती कोसळण्यासाठी शासनाच्या कृतीला हृदयस्पर्शी रूप द्यावं लागेल.
Comments are closed.