Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रवादीने केली ‘राष्ट्रवादी परिवार संवाद’ दौर्‍याची घोषणा

Get real time updates directly on you device, subscribe now.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सलग १८ दिवस दौऱ्यावर;१४ जिल्हे, ८२ मतदारसंघ व ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत घेणार आढावा

संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूंशी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मुंबई डेस्क, दि. २३ जानेवारी – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍या’ची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.

२८ जानेवारीपासून पहिल्या टप्प्याला सुरूवात होणार असून या दौऱ्याच्या माध्यमातून पक्षातील इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सलग १७ दिवस ३ हजार किलोमीटरचा प्रवास करत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच संवाद, समन्वय व पारदर्शकतेची भूमिका घेतली आहे. याआधीही पक्षाने कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ ही डिजिटल मोहीम हाती घेतली होती. राज्यातील कार्यकर्त्यांनी या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व सात लाख कार्यकर्त्यांपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आपला अभिप्राय या मोहिमेत नोंदवल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणखी एक पाऊल पुढे जात असून १७ दिवसांच्या या दौऱ्यात विदर्भ व खान्देशातील १४ जिल्हे, ८२ मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. शिवाय कार्यकर्त्यांच्या १३५ बैठका व १० जाहीर सभा होणार आहेत.

गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार असे १४ जिल्हे पायाखाली घालत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे कार्यकर्त्यांच्या अडचणी लक्षात घेणार आहेत शिवाय पक्ष वाढवण्यासाठी रणनीती आखली जाणार आहे. तसेच जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही या दौऱ्यात बैठका घेतल्या जातील व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍याचा हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात उर्वरित महाराष्ट्रात आम्ही फिरणार आहोत. या दौऱ्यात माझ्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रविकांत वर्पे, सुरज चव्हाण, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे उपस्थित राहतील असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस संवाद हा त्या भागातील पक्षाची सद्यस्थिती, स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह, त्यांना पक्ष संघटना वाढविण्यासाठी येणारी वेगवेगळी आव्हाने या गोष्टींचा आढावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न आहे.

महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत घवघवीत यश मिळाले. येत्या काही दिवसातच नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रवक्ते महेश चव्हाण, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.