तुमरकोठीत २४ तासांत नवे पोलीस स्टेशन उभारणी — अतिदुर्गम भागातील सुरक्षेस मोठा आधार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १९ :
माओवादग्रस्त व अतिदुर्गम असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग हेडरी अंतर्गत तुमरकोठी येथे अवघ्या २४ तासांत नवीन पोलीस स्टेशन उभारण्यात आले. छत्तीसगड सीमेपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या भागातील नागरिकांच्या सुरक्षेसह त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने ही उभारणी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
सुमारे १०५० मनुष्यबळ, सी–६० कमांडो, बीडीडीएस पथके, एसआरपीएफ, सीआरपीएफ जवान, जेसीबी, ट्रेलर व अवजड वाहनांच्या सहाय्याने हे पोलीस स्टेशन विक्रमी वेळेत कार्यान्वित करण्यात आले. येथे वायफाय सुविधा, पोर्टा कॅबिन, आरओ पाणी व्यवस्था, मोबाईल टॉवर, सुरक्षा भिंती, मोर्चे व इतर मूलभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत.
नवीन पोलीस स्टेशनचे उद्घाटन अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्या हस्ते, तर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या उपस्थितीत पार पडले. “सन २०२३ पासून निर्माण झालेल्या सुरक्षा पोकळी भरून काढण्याच्या साखळीतील हे नववे पोलीस स्टेशन असून, या भागाच्या सुरक्षिततेसाठी ते मैलाचा दगड ठरेल,” असे मत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान आयोजित जनजागृती मेळाव्यात स्थानिक नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाढलेल्या सुरक्षेमुळे भविष्यात रस्ते बांधकाम, एसटी बस सेवा व विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.
नवीन पोलीस स्टेशनमुळे आदिवासी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, त्यांनी पोलीस प्रशासनाप्रती समाधान व्यक्त केले.

