अनिल मडवीच्या हत्येवरून नवा प्रश्न – नक्षलवाद म्हणजे क्रांती की क्रूरता?
आदिवासी सुरक्षा समितीच्या वतीने समाजमनाला जागं करणारा हाक..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रवी मंडावार,
छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील पेद्दाकोर्मा गाव, वय केवळ १३ वर्ष. शिक्षण – सातवी. एक निरागस, सामान्य आदिवासी विद्यार्थी. नाव – अनिल मडवी याची १७ जून २०२५ हत्या करण्यात आली. त्या दिवशी अनिल मडवीच्या आयुष्याची फक्त हत्या झाली नाही… तर एका आदिवासी पिढीच्या भविष्यावरच रक्तरंजित प्रश्नचिन्ह उमटलं.
माओवादी कट्टरवाद्यांनी अनिलला गावकऱ्यांसमोर निर्दयतेने मारहाण केली, नंतर दोरीने गळा आवळून ठार केलं. त्याच्याबरोबर आणखी दोन निष्पाप जणांचा बळी घेतला. त्यांचा गुन्हा काय होता? केवळ इतकंच – की ते आत्मसमर्पित माओवादीच्या नातेवाईक होते. हा संशय, हा नातेसंबंध – मरणाचं कारण ठरला.
कल्पना करा, एका शांत आदिवासी गावात, लोकांच्या डोळ्यांसमोर एक चिमुकला मुलगा छटपटीत आहे, तडफडतोय… आणि कोणीही वाचवू शकत नाही, कारण समोर उभी आहे ‘क्रांतीची’ बंदूक. हा दृश्य डोळ्यांसमोर आलं तरी अंगावर शहारा येतो.
हे केवळ एक खून नाही. हे आहे विचारांचा छळ. हे आहे नक्षलवादी हिंसेच्या पातळीत झालेलं धसकटलेलं अधःपतन. माओवाद्यांची ही हिंसा कुठल्या क्रांतीसाठी? कोणत्या सामाजिक समतेसाठी? आदिवासी समाजच जर त्यांच्या बंदुकांचा बळी ठरत असेल, तर मग ते कोणासाठी लढत आहेत? हजारो आदिवासींना, दलितांना ठार मारणारी ही मंडळी कोणत्या नैतिकतेचा दावा करतात?
पण सर्वात मोठा आणि संतप्त करणारा प्रश्न – तथाकथित मानवाधिकारवादी, प्रगतीशील संघटना, समाजवादी प्रवक्ते आणि ‘आंदोलनजीवी’ यांचं यावर मौन का?
गाझा, फिलिस्तीनसाठी झेंडे घेऊन रस्त्यावर उतरायला जे तत्पर असतात, त्यांना बस्तरमधील अनिलसारख्या मुलाच्या मृत्यूवर शब्दही निघत नाहीत.PUCL, CPDR, तुंबडा, कबीर, भगतसिंह विचार मंच, आंबेडकरवादी संघटनांचं या अमानुषतेवर लवलेशही प्रतिक्रिया नाही.
का? माओवाद्यांबाबत मौन म्हणजे संमती नाही का? की ही मंडळी ‘अर्बन नक्षलवाद’ची पोसलेली शाखा आहेत?.. क्रांतीचा चेहरा जर इतका विद्रूप असेल, तर तो क्रांती नाही – ती दहशत आहे.
शस्त्रासमोर शोषितांचे स्वप्नं गाडणं हे क्रांती नाही – ती पाशवी सत्ता आहे.
अनिल मडवीचं रक्त हे आज माओवादी विचारसरणीच्या कडेलोटाचं साक्ष आहे.
आज जर आपण गप्प बसलो, उद्या तुमच्या आमच्या घरात अनिल जन्माला येईल… आणि पुन्हा कुणाच्यातरी बंदुकीतून त्याचं बालपण उडवलं जाईल.
त्यामुळे ही वेळ आहे, फक्त निषेधाच्या पोस्टरवर थांबण्याची नाही… ही वेळ आहे एकत्र येऊन ‘नवक्रांतीचा एल्गार’ करण्याची – जी बंदुकीतून नव्हे, तर न्यायातून जन्म घेईल.
अनिल मडवी आणि अशा हजारो निष्पाप आत्म्यांना आदरांजली… आणि माओवादी हिंसेविरोधात बुलंद जनशक्तीचा निर्धार!
– आदिवासी सुरक्षा समिती
Comments are closed.