आरोग्य अभियानातील कामगारांना नियुक्ती आदेश नाही; संतप्त कामगारांचा जिल्हा परिषदेत धडक आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ओझोन कंपनीमार्फत सेवा बजावणाऱ्या शेकडो कामगारांना वर्ष उलटूनही नियुक्ती आदेश न मिळाल्याने असंतोष उसळला आहे. या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात संतप्त कामगारांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनावर धडक दिली. हे कर्मचारी नेमके कोणाचे, समस्या कोणाकडे मांडायच्या आणि या कामगारांचा वाली कोण? असे थेट सवाल उपस्थित करत कामगारांनी प्रशासनाला घेराव घातला.
आरोग्यासारख्या संवेदनशील क्षेत्रात कामगारांकडे दुर्लक्ष करून कंपनीशी संगनमताने पिळवणूक केली जात असल्याचा ठपका वंचित आघाडीने ठेवला. यावेळी झालेल्या चर्चेत सीईओ गाडे यांनी सर्व तक्रारींची चौकशी करून एका आठवड्यात निश्चित तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मात्र, कामगारांचा अन्याय कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत, जर समस्या सोडवल्या गेल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बाळू टेंभुर्णे यांनी दिला.
या आंदोलनावेळी वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते जी.के. बारसिंगे, कवडू दुधे, तुळशिराम हजारे, भोजराज रामटेके, विलास केळझरकर, राजू डेंगरे, संजय मेश्राम, अरविंद जेंगठे, सुभाष भोयर, ज्योती कावळे, वैशाली सालोटकर, योगेश गोहने, मनिषा बोबडे, मनिषा मेश्राम, वंदना मस्के, पोर्णिमा डोंगरे, जास्वंदा मेश्राम, सुक्ष्मा खोब्रागडे यांच्यासह शेकडो कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.