निवडणुक काळात गावात दारूचा एकही थेंब येऊ देणार नाही
अतिदुर्गम दिंडवी ग्रामवासीयांचा निर्धार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या दिंडवी या गावातून अवैध दारूविक्री हद्दपार करण्यासाठी मुक्तिपथच्या मार्गदर्शनाखाली शक्तीपथ गाव संघटनेने अथक परिश्रम घेतले. त्यामुळेच गावात मागील महिन्याभरापासून अवैध दारूविक्री बंद आहे. या विधानसभा निवडणुकीच्या काळात गावात अवैध दारूचा एकही थेंब येऊ देणार नाही, असा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे.
दिंडवी हे गाव अतिदुर्गम भागात वसलेले आहे. या गावातील पुरुष व तरुणांना दारूचे व्यसन लागल्याने गावात गरीबी, दारिद्र्य व आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. गावात घरोघरी मोहफुलाची दारू गाळली जात होती. दोन दारू विक्रेते विदेशी दारूची विक्री करायचे. अशातच गावात मुक्तीपथ-शक्तिपथ स्त्री संघटना गठीत करून आयोजित बैठकीत महिलांनी गावातील तरुणाला तसेच आपल्या नवऱ्याला दारू पासून वाचवायचे ठरविले. त्यानुसार गावातील सर्वच प्रकारची दारू बंदी करण्यासाठी सर्व समाजाची बैठक बोलावून सर्वानुमते संपूर्ण दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला.
गावात यापुढे कोणी दारू विक्री केल्यास वीस हजार रुपये दंड घेण्याचे ठराव घेण्यात आला. या निर्णयामुळेच मागील महिनाभरापासुन अवैध दारूविक्री बंद असून गावात शांतता निर्माण झाली आहे. अशातच विधानसभा निवडणूक लक्षात घेता पुन्हा दारू येण्याची व गावात दारूविक्री सुरु होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुक्तीपथ शक्तिपथ गाव संघटनेची बैठक तालुका संघटक किशोर मलेवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. यावेळी विधानसभा निवडणूक यशस्वी करण्यासाठी गावात दारूचा एकही थेंब येवू देणार नाही. ही निवडणूक दारूमुक्त करू व गावातील दारूबंदी कायम ठेवू असा ठराव बैठकीत घेण्यात आला. यावेळी गावातील संतोष मडावी, विकास मोहूर्ल, माजी सरपंच शामलताई मडावी, अंगणवाडी सेविका सुचित्रा मोहुर्ले, आशा कार्यकर्ती हायसला मोहुर्ले, गाव पाटील, तंमुस समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments are closed.