नॉन-पेसा क्षेत्रातील मातांसाठी पौष्टिक आहाराचा उपक्रम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पेसा क्षेत्रातील मातांसाठी सुरू असलेल्या ‘डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजने’च्या धर्तीवर, आता जिल्ह्यातील नॉन-पेसा भागातील गरोदर व स्तनदा मातांसाठीही पौष्टिक आहाराची सुविधा उपलब्ध होणार आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने वेस्टर्न कोलफिल्ड्सच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून ‘मिशन संपूर्ण’ हा अभिनव उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.
या योजनेत आरमोरी, देसाईगंज, गडचिरोली, चामोर्शी आणि मुलचेरा या पाच तालुक्यांतील ३९७ अंगणवाडी केंद्रांचा समावेश आहे. सुमारे १३५० गरोदर स्त्रिया आणि १४०० स्तनदा माता यांना या मिशनद्वारे दररोज अंगणवाडी केंद्रांवर एकवेळ चौरस आहार — भात, पोळी, वरण, अंडी/केळी, आणि शेगदाणा लाडू किंवा चिक्की — पुरवला जात आहे.
‘मिशन संपूर्ण’ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु होऊन फेब्रुवारी २०२६ पर्यंत चालणार आहे. या उपक्रमामुळे नॉन-पेसा भागातील मातांना पोषण आणि आधार मिळून माता व बालकांच्या आरोग्यात सकारात्मक बदल घडेल, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी व्यक्त केले. या उपक्रमाची माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपक बानाईत यांनी दिली.
