नाल्यात बुडून सहा वर्षीय बालकासह एका व्यक्तीचा मृत्यू
भामरागडात पाच दिवसांत पुराने घेतले चौघांचे जीव; पायाभूत सुविधांकडे शासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २२ : गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात ऐन पोळ्याच्या सणाआधीच दुहेरी शोककळा पसरली आहे. सहा वर्षीय बालक आणि एका प्रौढ व्यक्तीचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. सलग पाच दिवसांत पुराने घेतलेल्या चार जीवांमुळे तालुक्यात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिली घटना – चिमुकला रिशानचा मृत्यू…
कोयार गावातील रिशान प्रकाश पुंगाटी (वय ६) हा लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेत पहिलीत शिकत होता. पोळ्याच्या निमित्ताने वडिलांनी त्याला गावी आणले होते. परंतु गुरुवारी संध्याकाळी तो गावाजवळील नाल्याकडे खेळायला गेला आणि परतलाच नाही.
गावकऱ्यांच्या शोध- मोहीमे नंतरही तो सापडला नाही. अखेर शुक्रवारी महसूल विभागाने राबवलेल्या शोधात नाल्यातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नाल्यावर पूल नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
दुसरी घटना – टोका मज्जीचा बुडून मृत्यू…
भटपार येथील टोका डोलू मज्जी (वय ३६) हे गुरुवारी संध्याकाळी शेताजवळील नाल्यावर आंघोळीसाठी गेले असता मिरगीचा झटका येऊन पाण्यात बुडाले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना सापडला. महसूल सेवक सुरेश मज्जी यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला.
मुळचे छत्तीसगडमधील हालेवाडा गावचे रहिवासी असलेले टोका मज्जी हे दहा वर्षांपासून भटपार येथे घरजावई म्हणून राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व दोन मुले असा परिवार आहे.
पाच दिवसांत चौघांचा बळी…
भामरागड तालुक्यातील मुसळधार पावसामुळे अनेक गावं पुराने वेढली आहेत. नद्या-नाल्यांवर पूल नसल्याने नागरिकांचा प्रवास जीवघेणा ठरत आहे. केवळ पाच दिवसांत पुराने चार जणांचे प्राण घेतले आहेत.
सोमवारी (ता. १८) कोडपे गावातील लालचंद कपिलसाय लकडा (वय १९) हा खंडी नाला ओलांडताना वाहून गेला. त्याच दिवशी जोनावाही येथील मुख्याध्यापक असंतू सोमा तलांडे यांचाही नाल्यात बुडून मृत्यू झाला. आता सहा वर्षीय रिशान पुंगाटी व टोका डोलू मज्जी यांच्या मृत्यूमुळे मृतांची संख्या चौघांवर पोहोचली आहे.
नागरिकांचा आक्रोश…
दरवर्षी पावसाळ्यात अशा घटना घडत असूनही शासन व प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. “पूल नसल्याने, रस्त्यांचा अभाव असल्याने, आमच्या जीवाशी खेळ होत आहे. आणखी किती बळी द्यावे लागतील?” असा जळजळीत सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
Comments are closed.