गोंडवाना विद्यापीठाच्या ट्रायसेफ नवसंशोधन केंद्रातील स्टार्टअप्सचा शासनाच्या कौशल्य विकास व उद्योग विभाग बैठकीत सहभाग
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोलीदि,१६ डिसेंबर : मंत्री ना. मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या कौशल्य विकास व उद्योग विभाग तर्फे आढावा बैठकीचे आयोजन चंद्रपूर जिल्हा नियोजन भवनात नुकतेच करण्यात आले होते. सदर बैठकीत स्थानिक उद्योगांच्या गरजा विचारात घेऊन औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) नव्या व उद्योगाभिमुख अभ्यासक्रमांची सुरुवात करणे आवश्यक असल्याचे मत राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त पुढाकारातून जिल्हा नियोजन भवनात अल्पकालीन अभ्यासक्रमांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या संचालक माधवी सरदेशमुख, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, राज्य नवोपक्रम सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकांत पाटील, सहसंचालक पी. टी. देवतळे, उपायुक्त प्रकाश देशमाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षिरसागर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वैभव बोनगीरवार, सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान गोंडवाना विद्यापीठातील न. न. व सा. तथा ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार यांनी कौशल्य विकासाशी संबंधित नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी महाराष्ट्र राज्य नवोपक्रम सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेण्यात आली. ट्रायसेफ नवसंशोधन केंद्राचे संचालक प्रा. मनीष उत्तरवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वृषांक सोरते यांनी महाराष्ट्र राज्य नवोपक्रम सोसायटीकडे ट्रायसेफकडून अधिकृत निवेदन तसेच उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल सादर केला.
तसेच ट्रायसेफच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संचालकांनी मंत्री ना. मंगल प्रभात लोढा यांच्याशी स्वतंत्र चर्चा करून ट्रायसेफद्वारे राबविण्यात येणाऱ्या नवोपक्रम, उद्योजकता विकास आणि स्थानिक युवकांसाठी निर्माण होणाऱ्या संधींबाबत माहिती दिली.

