स्मशानभूमीत डुक्करपालकांनी पुन्हा केले अतिक्रमण; अंत्यविधीवेळी दोन गटांमध्ये तुफान हाणामारी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागेपल्ली (ता. अहेरी) – अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील अहेरी – अल्लापल्ली मार्गावर आयटीआय च्या लगत आरक्षित स्मशानभूमीत पुन्हा एकदा डुक्करपालकांनी अतिक्रमण केल्याने ग्रामस्थांचा रोष उसळला असून अंत्यविधीच्या वेळीच दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली.
ग्रामपंचायतीने सुमारे वर्षभरापूर्वी स्मशानभूमीवरील बेकायदेशीर डुक्करपालन हटवले होते. मात्र, डुक्करपालकांनी पुन्हा त्याच ठिकाणी कब्जा केला होता. काल सायंकाळी गुरूनुले कुटुंबातील एका पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय आरक्षित स्मशानभूमीत अंत्यविधी करत असताना डुक्करपालकांनी विरोध करीत वाद निर्माण केला.
वाद विकोपाला गेल्याने दोन्ही गटांमध्ये सात ते आठ जणांनी परस्परांना मारहाण केली. या झटापटीत दोन्ही बाजूंनी जखमी झाले असून ग्रामपंचायत परिसरात तणावाचे वातावरण आहे.
प्रकरणावरून दोन्ही बाजूंनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी डुक्करपालकांच्या गटातील दोन जणांवर कलम 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, घटनेचा संपूर्ण तपास करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
नागेपल्ली ग्रामपंचायतने स्पष्ट केले की, स्मशानभूमी ही सार्वजनिक ठिकाण असून ती कोणत्याही अतिक्रमणापासून मुक्त ठेवली जाईल, असा निर्धार करण्यात आला आहे.