पोलीस पाटीलांच्या कुटुंबावरच गावकऱ्यांचा बहिष्कार, १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातलं सोनूना गावाच्या पोलीस पाटलानेच आपल्या कुटुंबियांवर गेल्या महिनाभरापासून गावकऱ्यांनी बहिष्कार टाकल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या तक्रारीनंतर १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी गाव सोनुना येथे पोलीस पाटलाने त्यांच्या शेतातील सभागृहात मंदिर उभारण्यास विरोध केल्याने, गावातील काही लोकांच्या दबावात येत, ग्रामस्थांनी पोलीस पाटील रमेश कदम (५३) व कुटुंबीयावर सामाजिक बहिष्कार घातला होता. या प्रकरणी रविवारी चान्नी पोलिसांनी गावातील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
३५ वर्षांपासून सोनूना गावचे पोलीस पाटील म्हणून काम करणारे रमेश नारायण कदम यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील पत्नी शशिकला कदम, आई गंगूबाई नारायण कदम, मुलगी गोकुळा, रिना, मुलगा प्रमोद कदम यांच्यावर ग्रामस्थांनी बहिष्कार घालून, किराणा, पीठगिरणीतून दळण आणि हातपंपावर पाणी भरण्यास मनाई केली होती, तसेच गावात कोणीही पोलीस पाटील कदम यांना नमस्कार केला किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींशी कुणी बोलले, तर त्याला १० रुपये दंड ठोठावण्याचे फर्मान दिले होते.
याबाबत पोलीस पाटील रमेश कदम यांनी चांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून बारा जणांविरुद्ध रविवारी (२३ May) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन बबन चोंडकर, देवानंद बबन चोंडकर, भारत बबन गिहे, अमोल गणेश हांडे, माणिक किसन कदम, दिनकर गणेश कदम, धोंडू सीताराम गिहे, डिगांबर साधू चोंडकर, गजानन परशुराम डाखोरे, सुधाकर आत्माराम गि-हे, संजय किसन चोंडकर, अंकुश भाऊराव चोंडकर या बारा लोकांविरुद्ध IPC कलम ३२३,५०४,५०६(३४) व सामाजिक बहिष्कार प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१६ मधील जनतेचे महाराष्ट्र संरक्षणानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास चांनी पोलीस स्टेशन करीत आहे.
हे देखील वाचा :
Comments are closed.