राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्याच्या प्रकारावर पोलिस तक्रारीस टाळाटाळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कुरखेडा : राष्ट्रध्वजाबाबत शासनाने घालून दिलेल्या स्पष्ट नियम व ध्वजसंहितेचे उल्लंघन करून तिरंगी राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असतानाही, कुरखेडा नगर पंचायत प्रशासनाने अद्याप पोलिसात तक्रार दाखल न केल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे प्रकरण केवळ प्रशासकीय दुर्लक्षाचे नव्हे, तर राष्ट्रीय सन्मानाशी निगडित गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
या संदर्भात प्रभारी मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार राजकुमार धनबाते यांना विचारले असता, “आम्ही सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांचे म्हणणे लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. चौकशीतून दोषी कोण आहे ते शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे त्यांनी सांगितले. मात्र, दोषी शोधण्याचे काम प्रशासनाचे नव्हे, तर पोलिस यंत्रणेचे आहे, हे वास्तव दुर्लक्षित करून नगर पंचायत प्रशासन पोलिस तक्रार टाळत असल्याने संशयाची छाया निर्माण झाली आहे.
विशेष म्हणजे, नगर पंचायत कार्यालयाच्या आवारात उभ्या असलेल्या भंगार कचरागाडीच्या टाकीत तसेच परिसरात अनेक तिरंगी राष्ट्रध्वज अनेक दिवसांपासून विखुरलेल्या अवस्थेत आढळून आले. हे ध्वज एका दिवसात फेकले गेले नसून दीर्घकाळ तसेच पडून होते, हे यावरून स्पष्ट होते. असे असताना स्वच्छता कर्मचारी, पर्यवेक्षक किंवा जबाबदार अधिकारी यांच्या निदर्शनास ही बाब येऊ नये, ही बाब कार्यालयीन स्वच्छता व पर्यवेक्षण किती ढिसाळ आहे, याचेच द्योतक ठरत आहे.
या पार्श्वभूमीवर, नगर पंचायतचा स्वच्छता विभाग पाहणाऱ्या समन्वयक व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे अपेक्षित होते, तसेच या प्रकरणी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल करून कायदेशीर चौकशी सुरू करणे गरजेचे होते. मात्र तसे न करता केवळ अंतर्गत चौकशीचा दिखावा केला जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, “कार्यालयीन परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना खुलासा मागितल्यास कोणताही कर्मचारी स्वतःहून अशा गंभीर गुन्ह्याची कबुली देणार नाही. अशा चौकशा बहुतांश वेळा औपचारिक ठरतात आणि अखेरीस तंबी देऊन प्रकरणावर पडदा टाकला जातो.” त्यामुळे या प्रकरणातून दोषींना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना अधिक बळावत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे अनेक राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या भावना दुखावल्या असून, राष्ट्रध्वजाचा अपमान हा केवळ प्रशासकीय चूक नसून कायद्याने दंडनीय गुन्हा आहे, याची जाणीव प्रशासनाला करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. जर अशा प्रकारांवर कठोर कारवाई झाली नाही, तर भविष्यात बेशिस्तीला खतपाणी मिळेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी ठाम मागणी कुरखेडा येथील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

