पोलिसांनी केला अवैध कोंबडा बाजार उद्ध्वस्त; १६ जणांवर गुन्हा, ११ दुचाकींसह सुमारे ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा वेग वाढवला असून, पेरमिली उप-पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रापल्ले गावात सुरू असलेल्या अवैध कोंबडा बाजारावर पोलिसांनी धाडसी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांचा जुगार खेळणाऱ्या १६ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ११ दुचाकींसह सुमारे ३ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रापल्ले गावाच्या बाहेरील मोकळ्या सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांच्या झुंजी लावून पैशांचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पेरमिली पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीने अचानक छापा टाकला. पोलिसांचा फौजफाटा पाहताच जुगार खेळणाऱ्यांची एकच धावपळ उडाली, मात्र पोलिसांनी घटनास्थळावरून १६ जणांना ताब्यात घेतले.
मुद्देमालाची मोठी जप्ती…
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून –
– ११ दुचाकी (विना नंबरच्या वाहनांसह एमएच-३३ पासिंगच्या विविध मोटारसायकली, अंदाजे किंमत सुमारे ३.७९ लाख रुपये),
– आरोपींच्या अंगझडतीतून २,२४० रुपये रोख,
– कोंबड्यांच्या झुंजीसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी कात्या व इतर साहित्य
असा एकूण ३,८५,३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पाल, अप्पर पोलीस अधीक्षक एम. रमेश व कार्तिक मधिरा, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पेरमिलीचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक सोनूने यांच्यासह पोलीस शिपाई गणेश भर्रे, सरय्या गांधामवर, संदीप ठवकर, संजय तोकलवाडे आणि दर्शन उंदीरवाडे यांचा समावेश होता.
अवैध धंद्यांना थारा नाही…
अवैध जुगार, कोंबडा बाजार आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कोणत्याही कारवायांवर यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा ठाम इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे मोडून काढण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक सातत्याने सक्रिय राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

