Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतीदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद - उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. ६ मे : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक न्यायाचे आदर्श राज्य निर्माण केले. सक्तीचे शिक्षण, दुर्बल घटकांना आरक्षण, पायाभूत सुविधांची निर्मिती, क्रांतिकारी सामाजिक सुधारणा करून सर्व घटकांना न्याय, विकासाची संधी दिली. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे घेऊन जाण्याची ताकद आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले आहे.

सामाजिक न्यायाचे जनक राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील सर्व घटकांना शिक्षणाची दारे खुली केली. शाळा, वसतिगृहे बांधली. शेतकऱ्यांसाठी धरणे बांधली. बाजारपेठा निर्माण केल्या. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज लोककल्याणकारी राजे, क्रांतिकारी विचारांचे थोर समाजसुधारक होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा फुले यांचा सत्यशोधक विचार पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करून प्रोत्साहन दिले. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, अनिष्ट प्रथा, रुढी, परंपरांना विरोध करून बंदी घातली. आंतरजातीय विवाहासाठी कायदा केला. सामाजिक न्यायाच्या, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या विचारातच समाजाला एकजूट ठेवून पुढे नेण्याची ताकद आहे.

महाविकास आघाडीचे सरकार राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवरच कार्य करत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

सर्वोच न्यायालयात मराठा आरक्षण रद्द होईल हे अपेक्षीत होते : डॉ. अशोक जिवतोडे

मराठा आरक्षणासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल – दीपक सुनतकर

Comments are closed.