Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खासगी हॉस्पिटलची अरेरावी; मनपाच्या आदेशानंतरही पैसे परत करण्यास नकार.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. ९ डिसेंबर : कोरोना रुग्णावर उपचार करताना एका खासगी हॉस्पिटलने मोठ्या प्रमाणात रुग्णाची लूट केली. त्याची तक्रार केल्यावर नागपूर महानगरपालिका अतिरिक्त आयुक्तांनी ७८ हजार २५० रुपये परत करण्याचा आदेश दिला. त्यानंतरही या हॉस्पिटलने पैसे परत करण्यास नकार दिला आहे.    सोमवारी क्वॉर्टर येथील रहिवासी दिवाकर आरेकर यांच्या आई तुळसाबाई आरेकर यांना कोव्हिड-१९ अन्वये उपचारासाठी रेडिअन्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. त्या तेथे जवळपास सात दिवस भरती होत्या. दरम्यान, या हॉस्पिटलने त्यांच्या उपचारावरील बिल १ लाख ५३ हजार ७०० रुपये काढले. यानंतर आरेकर यांनी उपचाराची अतिरिक्त रक्कम घेतल्याची तक्रार महापालिकेकडे केली. महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ७८ हजार २५० रुपये अधिकचे घेतल्याचे लक्षात आले. त्यामुळे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ही रक्कम संबंधित रुग्णाला परत करावी, असे निर्देश संबंधित रुग्णालयाला दिले.हे पत्र घेऊन आरेकर स्वत: रुग्णालयात जाऊन महापालिकेचे पत्र दाखवले. यावेळी बिलाची रक्कम तपासून एक महिन्यानंतर कळवण्यात येईल, असे त्यांना रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. एक महिना झाल्यानंतरही काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आरेकर यांनी पोस्टाद्वारे पत्र पाठवले. त्यालाही प्रतिसाद दिला नाही. आपली आर्थिक स्थिती चांगली नाही. त्यामुळे ही रक्कम परत करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी पुन्हा महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

Comments are closed.