‘ग्रीन गडचिरोली’साठी ११ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा आता केवळ खनिजसंपन्न नव्हे, तर हरिततेकडे झपाट्याने वाटचाल करणारा ठरणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत, ‘ग्रीन गडचिरोली’ उपक्रमांतर्गत ११ लाख ३० हजार वृक्ष लागवडीचा संकल्प घेण्यात आला आहे. लायल्ड मेटल अँड एनर्जी लिमिटेड, गोंडवाना विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय कर्टिन युनिव्हर्सिटी यांच्यात झालेल्या ऐतिहासिक सहकार्य करारानंतर, औद्योगिक प्रगतीबरोबर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श गडचिरोलीत उभारला जात आहे…
गडचिरोली शहरात ३० हजार वृक्षांची लागवड करत ‘ग्रीन गडचिरोली’ मोहिमेची औपचारिक सुरूवात झाली. लायल्ड मेटल अँड एनर्जी लिमिटेडने या अभियानाचा पुढाकार घेतला असून, संपूर्ण जिल्ह्यात ११ लाख वृक्ष लावण्याचा संकल्प यावेळी घेण्यात आला. कार्यक्रमाला जिल्ह्याचे कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, गोंडवाना विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रशांत उत्तरवार, तसेच लायल्ड मेटल अँड एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांची उपस्थिती होती.उद्योगांमध्ये कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कंपनीकडून डिझेलऐवजी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या यंत्रसामग्रीचा वापर सुरू करण्यात आला आहे. ‘हरित पोलाद’ निर्माणाचे ध्येय ठेवत, वाहतूक आणि प्रक्रिया क्षेत्रातही इको-फ्रेंडली तंत्रज्ञान लागू होत आहे.
गडचिरोलीतील ग्राइंडिंग प्लांटपासून कोनसरी गावापर्यंत स्लरी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. यामुळे ५० टक्क्यांहून अधिक ट्रक वाहतूक थांबणार असून, कार्बन उत्सर्जनात ५५% घट होणार आहे. ही महाराष्ट्रातील पहिली, तर भारतातील फक्त चौथी स्लरी पाईपलाईन ठरणार आहे.
शैक्षणिक पातळीवर महत्त्वपूर्ण करार- गोंडवाना विद्यापीठात लवकरच युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कार्यान्वित होणार असून, यामध्ये कर्टिन युनिव्हर्सिटीचा शैक्षणिक सहभाग राहणार आहे. स्थानिक तरुणांसाठी हरित तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रात नव्या संधींचा शुभारंभ या उपक्रमातून होणार आहे. गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त आणि मागास मानला जाणारा जिल्हा आता हरित विकासाचा नवा अध्याय लिहितोय. औद्योगिक प्रगती आणि पर्यावरण रक्षणाचा असा समतोल मार्ग इतरांसाठीही प्रेरणा ठरणार यात शंका नाही.


Comments are closed.