‘एक गाव, एक वाचनालय’ उपक्रमाची फलश्रुती : गडचिरोलीत स्पर्धा परीक्षा सराव पेपरला दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २६ मे : गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या ‘प्रोजेक्ट उडान’ या उपक्रमाला ठोस यश मिळताना दिसत आहे. ‘एक गाव, एक वाचनालय’ या संकल्पनेखाली जिल्हाभरात उभारण्यात आलेल्या वाचनालयांमध्ये आज स्पर्धा परीक्षा सराव पेपर – क्र. ०६ घेण्यात आला. या परीक्षेला जिल्हाभरातून तब्बल ३५०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत उपक्रमाच्या प्रभावीतेची प्रचीती दिली.
दुर्गम भागातही अभ्यासाची जागरूकता..
भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी, सिरोंचा यांसारख्या नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी देखील मोठ्या संख्येने सराव परीक्षेत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे पोलीस मदत केंद्र पेनगुंडा येथून १८ आणि पोलीस स्टेशन नेलगुंडा येथून १९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत, वाचन संस्कृती व स्पर्धा परीक्षांबाबत जागरूकतेचा नवीन टप्पा गाठल्याचे दिसून आले.
पोलीस मुख्यालयातील उपस्थिती आणि जिल्हाभर सराव परीक्षा केंद्रांची उभारणी…
गडचिरोली पोलीस मुख्यालयातील शहीद पांडु आलाम सभागृहात घेण्यात आलेल्या परीक्षेत एकट्या १३०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इतर ठिकाणी पोलीस ठाणी, उपपोस्टे, पोलीस मदत केंद्र तसेच ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धा परीक्षा म्हणजे आत्मविश्वासाची चाचणी – अपर पोलीस अधीक्षक रमेश यांचे प्रतिपादन..
या सराव परीक्षेवेळी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. एम. रमेश यांनी सांगितले, “ही टेस्ट सिरीज केवळ सरावापुरती मर्यादित नाही, तर विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. परीक्षेपूर्वी अनुभव मिळाल्यामुळे विद्यार्थी स्वत:ची तयारी तपासू शकतात, कमतरतेची जाणीव होते आणि सुधारण्यासाठी योग्य दिशा मिळते.”
पोलीस दलाचा अभ्यास वाचन संस्कृतीसाठी पुढाकार…
गडचिरोली पोलीस दल, पोलीस दादालोरा खिडकी, आणि यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी, दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पोहोचवले आहे. यामागे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांचे नेतृत्व आणि नागरी कृती शाखेचे पो.उ.नि. चंद्रकांत शेळके तसेच सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान विशेष उल्लेखनीय आहे.
शालेय पातळीवर स्पर्धा परीक्षांची बीजं..
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्यासोबतच पोलीस भरती, वनरक्षक भरती, तलाठी, संयुक्त परीक्षा यांसाठी योग्य दिशा व सरावाची संधी मिळाली आहे. एकीकडे पोलीस दलाच्या माध्यमातून लोकाभिमुख उपक्रम राबवले जात असताना, दुसरीकडे हे वाचनालय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ ठरत आहेत.
विशेष दृष्टिकोन :
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे हे उपक्रम म्हणजे केवळ परीक्षा नव्हे, तर शिक्षण, स्वप्न, आणि संधी यांचं नवचैतन्य आहे. ‘एक गाव, एक वाचनालय’ ही कल्पना आता ‘एक गाव, एक उज्वल भविष्य’ या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे.
Comments are closed.