Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दोन महिन्यांतच रस्त्याचा बोजवारा! गोवे–मुठवली मार्ग खचला, मोऱ्या व साईड पट्ट्यांचेही निकृष्ट काम; ग्रामस्थ संतप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

रोहा : तालुक्यातील गोवे ग्रामपंचायत हद्दीतील गोवे–मुठवली–शिरवली रस्त्याचे अवघ्या दोन महिन्यांतच तंत्रतोडे व निकृष्ट कामाचा पर्दाफाश झाला आहे. सुमारे ४.५८ कोटी रुपये खर्चून बांधलेला रस्ता खचला असून, साईड पट्ट्या आणि मोऱ्यांचे कामही अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे वास्तव उघड झाले आहे.

विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गाशी जोडणारा ५०० मीटरचा रस्ता चिखलात बुडाल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, “कोणाचा नाहक बळी गेला, तर त्याची जबाबदारी कोणाची?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दोन महिन्यांतच रस्ता खचला, मोऱ्या फुटल्या

पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या या कामात मुंबई-गोवा महामार्गापासून गोवे, मुठवली ते शिरवली मार्गावर ५ किमी लांबीचा रस्ता बांधण्यात आला होता. मात्र, पावसाची चाहूल लागताच अनेक ठिकाणी रस्ता खचू लागला असून, रस्त्याच्या कडेला असलेल्या साईड पट्ट्या उखडल्या गेल्या आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोऱ्यांचे बांधकामही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या ठिकाणी वाहतूक धोकादायक बनली आहे. विशेषतः महिसदरा नदीच्या काठाने गेलेला भाग पूर्णपणे खचला असून, नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेतीवर मोठ्या नुकसानाचा टांगता धोका निर्माण झाला आहे.

भातशेती, आंब्याची झाडे देणाऱ्या शेतकऱ्यांना फसवले..

या रस्त्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी विनामूल्य भातशेतीची जमीन तसेच अनेक वर्षांची हापूस आंब्याची झाडेही शासनाला दिली होती. फार्महाऊसधारकांनीही सहकार्य करून जागा उपलब्ध करून दिली. मात्र त्यांच्या त्यागाला ठेकेदारांनी उत्तर दिले ते केवळ निकृष्ट व अपूर्ण कामाने.

संरक्षण भिंतीसाठी खोदलेला भराव उघडा टाकून ठेवण्यात आला आहे, त्याठिकाणी भिंत बांधण्यात आलेली नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा थेट धक्का बसून रस्त्याच्या अधिकाधिक भागांचे नुकसान होण्याचा धोका आहे.

मुंबई-गोवा महामार्गापर्यंत चिखल आणि असुरक्षितता..

गोवे गावाकडे जाणारा ५०० मीटरचा रस्ता चिखलात बदलला असून, शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी, वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात ही स्थिती आणखी बिकट होणार, हे स्पष्ट आहे.

ग्रामस्थांची संतप्त प्रतिक्रिया व मागणी..

> “सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून दोषी ठेकेदाराकडून संपूर्ण रस्त्याचे, साईड पट्ट्यांचे व मोऱ्यांचे काम नव्याने आणि दर्जेदार पद्धतीने करून घ्यावे. तोपर्यंत ग्रामपंचायतीने कोणतेही बिल मंजूर करू नये, अन्यथा हा सर्वस्वी फसवणुकीचा प्रकार ठरेल,” अशी संतप्त मागणी गोवे ग्रामस्थ मंडळाने केली आहे.

पंतप्रधान ग्रामसडक योजनेची बदनामी..

या योजनेंतर्गत चांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागाचा विकास होतो, अशी सरकारची भूमिका असताना, या प्रकारामुळे संपूर्ण योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांच्या जिवाशी खेळणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

Comments are closed.