ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. विजय खोंडे यांचे निधन..
नागपूर येथे राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास; अहेरी परिसरात हळहळ..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय,अहेरी येथील सेवानिवृत्त प्राध्यापक आणि विज्ञान क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. विजय खोंडे यांचे शुक्रवारी (२ मे) सायंकाळी सुमारे सहा वाजता नागपूर येथे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
डॉ. खोंडे हे नागपूर येथील अंबाझरी हिल टॉप एरियामधील शिवार्पण अपार्टमेंट येथे वास्तव्यास होते. मागील काही महिन्यांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. सुरुवातीला पुणे येथे तर नंतर नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर, या दीर्घ आजारपणानंतर त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला.
डॉ. विजय खोंडे यांनी राजे धर्मराव विज्ञान महाविद्यालय, अहेरी येथून प्राध्यापक म्हणून दीर्घ सेवा केली. निवृत्तीनंतर त्यांनी गोंडवाना विद्यापीठांतर्गत न्यू मॉडेल डिग्री कॉलेजमध्ये काही काळ प्राचार्यपदही भूषवले.
विज्ञानाच्या प्रसाराबरोबरच ते मराठी विज्ञान परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पर्यावरण जनजागृती, तसेच शिक्षण, क्रीडा, कला आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असत. सामाजिक जाणिवेने प्रेरित होऊन त्यांनी अनेक होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य केले. त्यांच्या या बहुआयामी योगदानामुळे विविध संस्थांकडून त्यांना गौरविण्यात आले होते.
डॉ. खोंडे यांच्या निधनाने अहेरीसह गडचिरोली जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने एक समाजप्रबोधन करणारा विचारवंत आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक हरपला, अशा भावना सर्वत्र व्यक्त होत असून त्यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवार ३ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता नागपूर येथील अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Comments are closed.