सिरोंचा ग्रामीण रुग्णालय: रुग्णालयाची ‘अस्वस्थ’ स्थिती, रुग्णांची सीमापार धाव
गडचिरोलीच्या सीमेवरील तालुक्यात आरोग्य यंत्रणेचा पूर्ण बिघाड; उपचाराऐवजी हतबलता, प्रशासन गप्प..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धर्मराजु वडलाकोंडा
गडचिरोली/सिरोंचा प्रतिनिधी: “अस्वस्थ रुग्णालयात आरोग्य कसं सावरणार?” हा प्रश्न आज सिरोंचा तालुक्याच्या सीमाभागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना छळतो आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेला सिरोंचा तालुका आजदेखील प्राथमिक आरोग्य सुविधांच्या बाबतीत राज्याच्या विकासाच्या नकाशाबाहेर पडलेला दिसतो आहे. ग्रामीण रुग्णालय आहे, पण त्याच्या आत रुग्णापेक्षा जास्त संख्या रिक्त पदांची आहे. परिणामी रुग्णांना जिथे उपचार मिळायला हवेत, तिथून त्यांना नाईलाजाने शेजारच्या तेलंगणा किंवा छत्तीसगड राज्यातील रुग्णालयांकडे जावे लागते – ही शासन व्यवस्थेची अत्यंत दुर्दैवी आणि लज्जास्पद स्थिती आहे.
१९९४ मध्ये स्थापन झालेले रुग्णालय – आजही ३० खाटांवरच..
सिरोंचा ग्रामीण रुग्णालयाची स्थापना १९९४ मध्ये झाली. त्यावेळी केवळ ४० हजार लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात ३० खाटांची सुविधा पुरेशी वाटली होती. मात्र आज तालुक्याची लोकसंख्या ८५ हजारांहून अधिक असताना, अजूनही त्या रुग्णालयात केवळ ३० खाटांचाच आधार आहे. रुग्णसंख्या वाढली, गरजा वाढल्या, पण मनुष्यबळ आणि यंत्रणा मात्र जागेवरच राहिल्या. परिणामी, गंभीर रुग्णांपासून गर्भवती महिलांपर्यंत प्रत्येकालाच सीमापार जावं लागतंय – केवळ सरकारच्या उदासीनतेमुळे.
रिक्त पदांचा डोंगर, उपचारासाठी भटकंती..
सिरोंचा रुग्णालयात गेल्या ३ वर्षांपासून एक्स-रे तज्ज्ञाचे पद रिक्त आहे. लॅब तज्ज्ञांची २ पदं, सोनोग्राफी तज्ज्ञाचं १ पद, सहाय्यक अधीक्षकाचं १ पद आणि RBSK अंतर्गत डॉक्टरांची ४ पदं रिक्त आहेत. या रिक्ततेमुळे रुग्णांना किरकोळ तपासणीसाठीसुद्धा अहेरी किंवा मंचेरियाल (तेलंगणा) गाठावी लागते. सोनोग्राफीसाठी तर गर्भवती महिलांना १०० किमी प्रवास करावा लागतो. ही केवळ गैरसोय नसून, हा आरोग्याच्या हक्कावर घाला आहे.
सौरऊर्जेचं यंत्र बंद, ‘रेफर’चा अतिरेक सुरू..
२०१४ मध्ये रुग्णालयात सौरऊर्जेची यंत्रणा बसवण्यात आली होती, मात्र ती देखील गेले ३ वर्षे बंद आहे. रक्तदाब, अपघात, हृदयरोग यांसारख्या तातडीच्या रुग्णांकरिता आवश्यक उपकरणांचा पुरवठा नाही. त्यामुळे रुग्णांना तातडीने हलवावे लागते. याच रेफर प्रक्रियेत काही रुग्णांचे जीवही गेले आहेत – हे सरकारच्या ‘आरोग्य हमी’ घोषणांवर केलेले क्रूर उपहासासारखे वाटते.
जमिनीवर झोपणारे रुग्ण, तारेवरची कसरत करणारे कर्मचारी..
सिरोंचाच्या रुग्णालयात केवळ ३० खाटांच्या रुग्णालयात शंभरावर रुग्ण दाखल आहेत. अनेकांना जमिनीवर झोपावे लागते. अत्यल्प मनुष्यबळ असतानाही वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांना अविरत सेवेसाठी लढावे लागत आहे. मात्र, या कर्मचाऱ्यांच्या सेवेला आणि रुग्णांच्या वेदनांना अद्यापही प्रशासकीय प्रतिसाद मिळालेला नाही. शासनाने अहेरीला उपजिल्हा रुग्णालयाचे दर्जा दिला, आधुनिक उपकरणांची घोषणा केली. पण सिरोंचा – जो तेलंगणा सीमेवर असून अनेक आदिवासी व दुर्बल घटकांचे वैद्यकीय केंद्र आहे – त्याचा उल्लेखही कोणत्याही आरोग्य विकास योजनांमध्ये होत नाही. सीमावर्ती भागांमध्ये नागरी सुविधा पुरवण्याचे जे नैतिक कर्तव्य असते, ते सरकारने पार पाडले नाही.
शेवटी प्रश्न हाच — “रुग्णालय चालवायचं की रुग्ण हलवायचे?”
सिरोंचा तालुका ‘रेफर’ नावाच्या एका अदृश्य शासकीय पळवाटीवर उभा आहे. रुग्णालयात ‘उपचार’ नाही, तरी फक्त ‘रेफर’ करून जबाबदारी झटकण्याची सरकारी संस्कृती येथील नागरिकांना नशिब मानून जगायची सवय लावत आहे. पण प्रश्न असा आहे की, ही उदासीनता किती काळ सहन करायची?
Comments are closed.