नागरिकांच्या अडचणी तत्काळ सोडवा – खा. किरसान यांची नगर परिषदेत आढावा बैठकीत निर्देश..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली – गडचिरोली नगरपरिषद क्षेत्रातील प्रलंबित नागरी समस्या, पाणीपुरवठा, स्वच्छता, अतिक्रमण आणि विकासकामांच्या अंमलबजावणीचा आढावा खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी घेतला. नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत निर्देश दिले की, नागरिकांच्या समस्या थांबवू नका, तात्काळ उपाययोजना करा.
शहरातील अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे अतिक्रमित जागांवर राहतात. अशा गरीब व गरजूंना घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी पट्टे वाटपाची प्रक्रिया त्वरीत सुरू करा, अशी ठोस मागणी बैठकीत झाली. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असून, प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाणी पोहोचवण्यासाठी जलवाहिनी आणि वितरण व्यवस्थेची तत्काळ दुरुस्ती व्हावी, असेही स्पष्ट करण्यात आले.
स्वच्छता मोहीम, नालीसफाई, कचरा व्यवस्थापन, मंजूर कामांची गुणवत्ता आणि सौंदर्यीकरणाच्या कामांबाबतही खासदारांनी चिंता व्यक्त केली. शहर उन्नत होण्यासाठी प्रशासनाने निष्काळजीपणा न करता तातडीने कामे मार्गी लावावीत, असे ते म्हणाले.
बैठकीत नागरिकांनी थेट आपल्या अडचणी, तक्रारी आणि अपेक्षा मांडल्या. त्यावर विशेष लक्ष देत, खासदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. नागरी सुविधा वाढवताना जनतेचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर, काँग्रेस पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments are closed.