Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस; कासमपल्ली ते येमली मार्गावर ऐतिहासिक सुरुवात

‘लालपरी’; ने अहेरी ते येमली मार्गावर पहिल्यांदाच एसटी बससेवा, ग्रामस्थांत जल्लोषाचे वातावरण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

अहेरी (प्रतिनिधी) : जिथं आजवर पायवाटेने प्रवास करावा लागत होता, जिथं रुग्णवाहिकेपेक्षा झोळीचा आधार अधिक विश्वासार्ह वाटत होता, त्या दुर्गम आदिवासी पट्ट्यात अखेर ‘लालपरी’चा शिट्टीसह शुभारंभ झाला! अहेरी ते येमली मार्गावरून, कासमपल्ली, गुर्जा बुज., वेडमपल्ली, कोंदावाही, बिड्री या गावांना स्पर्श करत पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस सुरू झाली आहे.

या ऐतिहासिक क्षणाचा प्रारंभ माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा आत्राम यांच्या हस्ते नारळ फोडून आणि हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्यांच्या समवेत डॉ. मिताली आत्रामही या बसच्या पहिल्या फेरीत सहभागी झाल्या. दोघांनी बसने थोडा प्रवास करत उपस्थित ग्रामस्थांच्या आनंदात सहभागी होत या ऐतिहासिक घडामोडीचा साक्षीदार ठरण्याचा मान मिळवला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वाट होती खडतर, पण प्रवास आता सुरू…

स्वातंत्र्यानंतर अनेक दशके या भागात ना पक्के रस्ते, ना वाहतुकीची साधने. कासमपल्लीपासून येमलीपर्यंतचा मार्ग म्हणजे खाचखळग्यांनी भरलेली, पावसात जणू सापशिडीची झालेली वाट! पण 2019 मध्ये आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी या भागाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी या रस्त्याच्या दुरवस्थेकडे गांभीर्याने लक्ष दिले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

त्यांच्या प्रयत्नातून 2020-21 मध्ये या रस्त्याचे काम मंजूर झाले आणि सलग तीन वर्षांच्या सातत्याने, नियोजनबद्ध प्रयत्नांनी अखेर हा रस्ता साकार झाला. रस्ता पूर्ण झाल्यावर आमदार आत्राम यांनी एसटी सेवा सुरू करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा केला. आणि आज, तो प्रयत्न फळाला आला.

बस’ नाही, विकासाची ग्वाही!

ही केवळ एक एसटी बस नाही, तर विकासाच्या दाराशी आलेली आशा आहे. या बसमार्गामुळे 10 ते 12 गावांना थेट जोडणी मिळाली आहे. बाजारहाट, शाळा, दवाखाना, सरकारी कार्यालये – सर्वांपर्यंत पोहोचणं आता स्वप्न राहिलं नाही. ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने क्रांती घडवणारी ही बससेवा ठरू शकते.

गावाकडं उत्सवाचं वातावरण..

या शुभारंभप्रसंगी डॉ. मिताली आत्राम यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव व येरमनारचे माजी सरपंच बालाजी गावडे, कासमपल्लीचे पाटील जोगा मडावी, ग्रामपंचायत सदस्य यशवंत कोडापे, तसेच अनेक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही मोठी उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली.

ग्रामस्थांच्या भावना : “आता मुलं शिकायला जातील”..

“आमच्या लेकरांना आता गावाबाहेर शिकायला सोप्पं होईल. आधी वाट पाहत बसावं लागायचं, आता बस थेट दाराशी येते,” असं सांगताना एका मातेला अश्रू अनावर झाले. हे अश्रू फक्त आनंदाचेच नव्हे, तर एका प्रतीक्षेच्या समाप्तीचे होते.

 

Comments are closed.