विवेकानंद जयंतीनिमित्त गडचिरोलीत ‘राष्ट्रीय युवा सप्ताह’; युवकांसाठी स्पर्धा व उपक्रमांची मेजवानी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. ९ : स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून दि. १२ ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत गडचिरोली जिल्ह्यात ‘राष्ट्रीय युवा दिन व युवा सप्ताह’ साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
युवकांचा सर्वांगीण विकास, त्यांच्यात राष्ट्रप्रेम, सामाजिक भान व नेतृत्वगुणांची जोपासना करणे, तसेच राष्ट्रीय व सामाजिक कार्यात सक्रीय सहभागासाठी युवकांना प्रेरित करणे, हा या युवा सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्र उभारणीमध्ये युवकांची भूमिका निर्णायक असल्याने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, नियोजन व अंमलबजावणीत युवकांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या युवा सप्ताहाच्या निमित्ताने युवकांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव, शारीरिक क्षमता वाढीस चालना, व्यायाम व खेळांची गोडी निर्माण करणे, तसेच सामाजिक ऐक्य बळकट करणे, हेही महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी चर्चासत्रे, परिसंवाद, युवा मेळावे, राष्ट्रीय एकात्मता उपक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत निबंध, वक्तृत्व व चित्रकला स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात येणार असून १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवकांसाठी सहभाग खुला आहे. जिल्ह्यातील युवकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवकांनी कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

