Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गटई ठेल्यांची थट्टा थांबवा – युवकांना हवी आधुनिक स्वावलंबनाची साधने

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : काळ बदलला, समाजाची आकांक्षा बदलली, तरुणाईची स्वप्ने बदलली; पण शासनाच्या योजना मात्र अजूनही जुन्याच चौकटीत अडकलेल्या आहेत. अनुसूचित जातीतील समाजबांधवांसाठी अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत वाटप होणाऱ्या पारंपरिक गटई ठेल्यांच्या योजनेविरोधात गडचिरोलीतून आता असंतोषाचा आवाज बुलंद झाला आहे. “गटई ठेल्यांवर उदरनिर्वाह शक्य नाही, युवकांना जगण्याजोगा आधुनिक व्यवसाय हवा” असा ठाम स्वर समाजातून उमटला असून शासनाने तातडीने या वास्तवाची दखल घ्यावी, अशी मागणी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्याने निवेदनाद्वारे केली आहे.

दिनांक २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत समाजकल्याण मंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात संघटनेने स्पष्ट नमूद केले की, गटई ठेले वाटपाची योजना आजच्या काळाशी विसंगत ठरली आहे. बेरोजगारीमुळे सुशिक्षित तरुण-तरुणी निराशेत बुडत असून त्यातून व्यसनाधीनता, आत्महत्या आणि सामाजिक अराजकतेची चिंताजनक स्थिती निर्माण होत आहे. अशा वेळी शासनाच्या योजनांनी त्यांना आधार द्यावा की उपहास, असा सवाल निवेदनातून उपस्थित करण्यात आला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

संघटनेने पारंपरिक साधनांऐवजी युवकांना रोजगारक्षम ठरणारी आधुनिक साधने – जसे की ऑटो-रिक्षा, पिकअप व्हॅन, मेटॅडोर, कार आदी – उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. “आत्मनिर्भरतेच्या नव्या युगात युवकांच्या हातात केवळ गटई ठेला न देता उपयुक्त भांडवल द्या, उद्यमशीलतेचा मार्ग दाखवा, तरच खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय साध्य होईल,” असे वक्तव्य या मागणीतून अधोरेखित झाले.

शासनाने केवळ साधनांचे वाटप न करता त्याचा परिणामकारक वापर होण्यासाठी कौशल्य विकास शिबिरे, उद्यम मार्गदर्शन कार्यशाळा आणि आर्थिक साक्षरतेचे प्रशिक्षण यांची तातडीची आवश्यकता असल्याचेही संघटनेने स्पष्ट केले. योजनांची आखणी करताना समाजातील बदलते वास्तव, बाजारपेठेतील मागणी आणि युवकांच्या क्षमतांचा विचार केला गेला नाही, तर त्या योजना केवळ कागदोपत्री राहतील, असा गंभीर इशारा निवेदनातून देण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या मागणीला समाजातील विविध स्तरांतून एकमुखी पाठिंबा लाभला. सामाजिक कार्यकर्ते मान. लक्ष्मण मोहुर्ले, प्रदेश महिला अध्यक्ष मयाताई मोहुर्ले, प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, सचिव किशोर नरूले, सहसचिव संदीप येनगंटीवार, जिल्हा अध्यक्ष सुनील मोहुर्ले, शहर अध्यक्ष किशोर देवतळे, जिल्हा सचिव योगेश गोरडवार, संतोष कोपुलवार, देवेंद्र लाटकर, राष्ट्रपाल अत्राम यांच्यासह मान्यवर, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासनाला दिलेली ही हाक केवळ निवेदनापुरती मर्यादित न राहता लवकरच ती आंदोलनाच्या रूपात पेट घेईल, अशी चर्चा समाजात सुरू झाली आहे.

Comments are closed.