मौजा किटाळीत विद्यार्थ्यांचे बस रोको आंदोलन
एसटी बस गावात थांबत नसल्याने संताप; २ ते ३ तास वाहतूक ठप्प...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. १७ :
आरमोरी तालुक्यातील मौजा किटाळी येथे आज विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत बस रोको (चक्का जाम) आंदोलन केले. किटाळी परिसरातून सुमारे २०० विद्यार्थी दररोज देऊळगाव व आरमोरी येथे शिक्षणासाठी प्रवास करतात. हे विद्यार्थी बहुसंख्येने शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील असून, एसटी बस हाच त्यांचा एकमेव सुरक्षित प्रवासाचा मार्ग आहे.
या भागात वाघाची दहशत असल्याने पायी किंवा अन्य पर्याय उपलब्ध नसताना, एसटी बस गावात थांबा असतानाही थांबत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून विद्यार्थ्यांना व सामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अनेक विद्यार्थ्यांच्या शाळा बुडाल्या होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्याने अखेर किटाळी, आकापूर, सूर्यडोंगरी व चुरमुरा येथील विद्यार्थी व ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.
आज सकाळी किटाळी येथे सुमारे २ ते ३ तास बस रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परिस्थिती गंभीर होताच तहसीलदार दोंनाडकर, पोलीस निरीक्षक तसेच एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मध्यस्थी केली. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते. जनतेच्या वतीने माजी आमदार आनंदराव गेडाम, आनंदराव आकरे तसेच कॉ. अर्चना अमोल मारकवार यांनी प्रशासनासमोर विद्यार्थ्यांची भूमिका ठामपणे मांडली.

