Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड लोह खाण काॅग्रेस – भाजप सरकारचे पाप

शेतकरी कामगार पक्षाचा आरोप

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क 

गडचिरोली, 16, में – स्थानिक आदिवासी आणि त्यांच्या वैधानिक ग्रामसभांनी सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील लोह खाणींना प्रखर विरोध केला आहे. मात्र भांडवलदारांच्या दावणीला बांधलेल्या त्या त्या वेळच्या काॅग्रेस – भाजप सरकारने खाणींचे रोजगाराच्या नावाने समर्थन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक करण्यात येत आहे. या प्रकारामुळे भीषण अपघात होवून आतापर्यंत अनेकांना जीवाला मुकावे लागण्याचे पाप काॅग्रेस – भाजपने केले आहे, असा आरोप शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात २५ लोह खाणी प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. स्थानिक आदिवासी आणि त्यांच्या वैधानिक ग्रामसभांनी प्रखर विरोध केल्याने इतर लोह खाणी सुरू होवू शकल्या नाहीत. मात्र काॅग्रेस – भाजपच्या सरकार पक्षांच्या नेत्यांनी त्या त्या वेळी लोह कंपन्यांची दलाली केली आणि रोजगाराच्या नावाने सुरजागड येथे लोह खाणी सुरू करण्यास भाग पाडले. आज त्याच लोह खाणीतून होणाऱ्या वाहतूकीमुळे अपघात होवून अनेक निष्पापांना जीवाला मुकावे लागत असून दलाली करणाऱ्या पक्षांच्या नेत्यांकडून वाहतुकीविरोधात आंदोलन करण्याची भाषा करुन जनतेची दिशाभूल केली जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

खरे तर सुरजागड लोह खाणीतून उत्खनन करण्यात येणाऱ्या लोह खनिजाच्या वाहतुकीचे कंत्राटच काॅग्रेस – भाजपच्या विदर्भातील बड्या नेत्यांनी घेतले आहे. या नेत्यांना कंपनीने रस्तेनिहाय जबाबदारी दिलेली असून त्यांच्या नियंत्रणात अनेक वाहतूकदार आपले वाहन पेटी कंत्राट पध्दतीने चालवत आहेत. सुरजागड लोह खाण ते गड्डीगुडम डंपिंग यार्ड पर्यंत एका स्थानिक नेत्याची मक्तेदारी आहे. आलापल्ली ते भंडारा, उमरेड काॅग्रेस नेत्याची तर आलापल्ली ते चंद्रपूर, घुग्गस वाहतूक भाजपच्या एका मंत्र्याकडे आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पदाधिकाऱ्यांची कोल्हेकुई जनतेला न्याय मिळवून देईल काय? असा सवालही शेतकरी कामगार पक्षाने केला आहे.

जिल्ह्यातील जंगल आणि आदिवासी संस्कृती वाचवून त्यावर आधारित उद्योग उभे होवून रोजगार आणि विकास व्हावा, असे काॅग्रेस – भाजपला वाटत असेल तर त्यांनी गेल्या ७० दिवसांपासून तोडगट्टा येथे जिल्ह्यातील मंजूर आणि प्रस्तावित लोह खाणींविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ भूमिका घ्यावी मोठे आंदोलन उभे करुन जनहिताची भूमिका घेण्याचे आव्हान शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, महिला नेत्या जयश्रीताई वेळदा, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष भाई अक्षय कोसनकर, तुकाराम गेडाम, चंद्रकांत भोयर यांनी भाजप – काॅग्रेस च्या स्थानिक नेत्यांना दिले आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.